बॉलीवूड दिग्दर्शक शशांक खेतानचा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाची फ्रँचाईझी असलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केलेय की, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चा पहिल्या दिवशी प्रभाव पाहायला मिळाला. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये चित्रपटाची चर्चा अधिकच रंगली. पहिल्या दिवशी चित्रपटाने १२.२५ कोटींची कमाई केली आहे.
करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. वरुण आणि आलिया यांच्या अभिनयासह दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या कामाचीही प्रशंसा केली जात आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. याआधी चित्रपट वितरक अक्षय राठी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलेले की, हा चित्रपट पहिल्या दिवशी १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार नाही. सुट्ट्यांचा विचार करता प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसात चित्रपट जवळपास ४०-५० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. सोमवारी रंगपंचमी असल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट पाहायला मिळू शकते. आलिया आणि वरुणचा एक चांगला चाहता वर्ग आहे. हे दोन्ही कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचतात.
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या स्वत:च दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाच्या फ्रँचाईझीपटाची मांडणी करणं शशांक खेतानसाठी एक आव्हान होतं. पहिल्या चित्रपटात फक्त दुल्हनिया बनण्यातच रस असलेली नायिका काव्या नव्या चित्रपटात पूर्ण बदलली आहे. इथे वैदेही दुल्हनिया म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून पुढे येते. या नायिकेला प्रेम हवं आहे पण तिला तिचा योग्य तो मानही हवा आहे. तिला अपेक्षित असलेलं आदरयुक्त प्रेम मिळेपर्यंत ती झगडत राहते. आजच्या काळाबरोबर चालणारी, आपला स्वत:चा आवाज सतत चाचपडून पाहणारी आणि त्यानुसारच पुढे जाणारी कणखर तरीही प्रेमळ दुल्हनिया ही या चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे. दरम्यान, ‘बद्री की दुल्हनिया’ शेवटाकडे येताना ‘वैदेही का दुल्हा’ या विचारापर्यंत येतो. पुढच्या फ्रँचाईजीसाठी हा विषय चांगला आहे.