सोशल मीडियावर कोणाला कधी कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागेल याचा काहीच नेम नाही. अभिनेता कार्तिक आर्यनसोबतही सध्या असाच प्रसंग घडला आहे. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या कार्तिकला सध्या बऱ्याच प्रोजेक्ट्सची ऑफर येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ‘ए- लिस्टर्स’मध्येही त्याच्या नावाचा उल्लेख केला जाऊ लागला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याला बॉलिवूडची लॉटरी लागली असं म्हणायला हरकत नाही. फक्त चित्रपटच नव्हे, तर फॅशन जगतातही कार्तिकची एंट्री झाली असून सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी त्याने रॅम्पवॉक केला. बी- टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबत कार्तिक रॅम्पवर आला आणि सर्वांचं लक्ष वेधून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंगापूरमध्ये पार पडलेल्या या फॅशन शोचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच खुद्द कार्तिकनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो करिनासोबत दिसत होता. काही युजर्सना त्याचा हा व्हिडिओ भावला, पण काहींनी मात्र त्याच्यावर नाकं मुरडल्याचं पाहायला मिळालं. कार्तिक आणि करिनाच्या या व्हिडिओमध्ये अनेकांना काही गोष्टी खटकल्या. करिनाशी फ्लर्ट करण्याचा त्याचा अंदाज पाहून बऱ्याचजणांनी त्याच्यावर आगपाखडही केली.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये कार्तिक ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटातील ‘बन जा तू मेरी रानी’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. कार्तिक आणि करिनाची ही अदा पाहून कार्तिकला उद्देशून एका युजरने म्हटलंय, ‘तुम्हारी रानी किसीकी महारानी है..’, तर एका युजरने ‘ती कोणाचीतरी आई आहे’, असं म्हणत त्याच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे एका अर्थी मजामस्करीत का असेना पण, करिनाशी फ्लर्ट करणं त्याला चांगलंच भोवलं असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kartik aaryan flirts with actress kareena kapoor gets trolled on instagram social media