अभिनेत्री करिना कपूर आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांच्या मुलाचा म्हणजे सर्वांच्याच लाडक्या तैमुरचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा झाला. पतौडी कुटुंबातील या सर्वात गोंडस नवाबाचा वाढदिवस वडिलोपार्जित पतौडी पॅलेस येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी करिना आणि सैफच्या कुटुंबातील काही मंडळींनी त्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.
तैमुरचा पहिला वाढदिवस नेमका कसा आणि कुठे साजरा केला जाणार याविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला. पण, सेलिब्रिटी मित्रमंडळींची गर्दी न करता अगदी छोटेखानी, कौटुंबिक सोहळ्यातच या छोट्या नवाबाचा वाढदिवस साजरा झाला. सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळातूनही तैमुरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. लहानग्या तैमुरवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्याची मावशी, अभिनेत्री करिष्मा कपूर सोशल मीडियावरुन पतौडी पॅलेसमध्ये सुरु असणाऱ्या या धमाल वातावरणाचे फोटो पोस्ट करत होती. इतकेच नव्हे तर करिना, सैफ आणि तैमुरच्या फॅन पेजेसवरुनही हे फोटो पोस्ट करण्यात आले. यामध्ये वाढदिसाच्या निमित्ताने सजलेला पतौडी पॅलेसचा परिसर पाहायला मिळाला. करिना आणि सैफ यावेळी फार आंनंदात दिसत होते, तर तैमुर त्याच्या बर्थडे केकसोबत खेळण्यावर जास्त लक्ष देत असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळाले.
करिष्मा कपूरही तिच्या भाच्याच्या वाढदिवसानिमित्त फारच आनंदात होती. सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी किड्सच्या यादीत तैमुरेचे नाव अग्रस्थानी आहे असे म्हणायला हरकत नाही. फक्त चाहत्यांमध्येच नव्हे तर सेलिब्रिटीं वर्तुळातही तैमुरविषयीचे वेड पाहायला मिळते.
वाचा : बिल गेट्सनाही भावला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’