परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण देशभरात खूप यश मिळत आहे. चीनमध्ये ‘दंगल’ची जोरदार कमाई अद्याप सुरूच आहे. चीनमध्ये आता ‘दंगल’ने १६९ मिलियन डॉलर्सवर कमाई केली आहे. या रेकॉर्डब्रेक कमाईसोबत दंगलने हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या चित्रपटाने ३१ व्या दिवशी ३.५३ मिलियन डॉलरच्या कलेक्शनसह १६९.१६ मिलियन डॉलर म्हणजेच १०८८ कोटींचा टप्पा गाठला आहे. दंगलची जगभरातील कमाई आता १८७० कोटी रुपये झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’मध्ये कुस्तीसारख्या पुरूषी खेळात नाव कमावलेल्या फोगाट बहिणींची संघर्ष मांडणारी कथा आहे. मागील वर्षाच्या अखेरीस भारतासह इतर देशात प्रदर्शित झालेल्या आमिरच्या या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटामुळे लोकांवर झालेल्या सकारात्मक परिणामामुळे मेहनतीचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया आमिर खानने दिली होती. ‘या चित्रपटाचा लोकांवर आणि मुलींकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर खोलवर प्रभाव पडला. इतकेच नव्हे तर कुस्तीच्या क्षेत्रातही याचा मोठा परिणाम झाला. सिनेमा पाहिल्यानंतर लोकांनी कुस्तीमध्ये दाखवलेली आवड लक्षणीय आहे.’ असे आमिर खान म्हणाला.

परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत या चित्रपटाला अव्वल स्थान मिळाले आहे. ‘दंगल’ने गेल्या वर्षी सर्वाधिक व्यवसाय केला आहे. दंगलने तैवानी मार्केटमध्येही ३६.५० कोटींची कमाई केली आहे. ज्यानंतर भारताबाहेरील या चित्रपटाचा व्यवसाय १३२७.५० कोटींचा झाला आहे. आता आमिर खानचा हा चित्रपट कमाईमध्ये आणखी किती ‘दंगल’ करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangal collection closer to 1100 cr in china