एकादी मालिका प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठीचं महत्त्वाचं माध्यम असतं ते म्हणजे त्याचं शीर्षक आणि शीर्षकगीत. आजवर बऱ्याच मालिकांच्या शीर्षकगीतांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच अशी छाप पाडली आहे. मराठी कलाविश्वात सांगावं तर, काही मालिकांच्या शीर्षकगीतांना प्रेक्षकांचीही पसंती मिळाली आहे. यामध्ये झी मराठी आघाडीवर असल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे. मग ते ‘वादळवाट’ असो किंवा ‘आभाळमाया’ किंवा मग काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेलं ‘गाव गाता गजाली’चं धमाल शीर्षकगीत. यातच आता आणखी एका गीताची भर पडली आहे. नेहमीच नव्या संकल्पनांच्या मदतीने मालिकेचं शीर्षकगीत साकारण्याला प्राधान्य देणाऱ्या झी मराठीने पुन्हा एकदा कलेचा एक अद्वितीय नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘ग्रहण’ या मालिकेच्या शीर्षकगीतातून हा नजराणा म्हणतेच ‘इंक आर्ट’ पाहायला मिळत आहे. पल्लवी जोशीची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या मालिकेचं शीर्षकगीतही जमेची बाजू ठरत आहे. मालिकेच्या कथानकाचं सार असणारं हे गीत सुरु असताना पडद्यावर येणारी दृश्य काही क्षणांसाठी आपल्याला एकाच ठिकाणी खिळवून ठेवतात. ही सारी किमया साध्य झाली आहे, ‘ग्रहण’च्या संपूर्ण टीममुळे. देवकी पंडित यांचा आवाज आणि अशोक पत्की यांचं संगीत लाभलेल्या या शीर्षकगीताच्या मेकिंगचा व्हिडिओ नुकताच झी मराठीच्या फेसबुक पेजवरुन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्हिडिओमध्ये शाईच्या एका ओघळाने कशी सुंदर कलाकृती साकारली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे.

ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?

शीर्षकगीताच्या मेकिंच्या या व्हिडिओमध्ये ‘क्षणमात्र घडली माया क्षणात विश्व बुडाले…’ असे शब्द कानी येतात आणि नेमकी ही कला साकारली कशी याची झलकही पाहायला मिळते. विक्रांत शितोळे यांच्या कल्पनाशक्तीतून उतरलेली ही कलाकृती अनेकांचीच मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे एखाद्या कलाकाराला अभिनय कसा करायचा आहे, हे सांगितलं की तो त्याप्रमाणे अभिनय करतो. पण, शाईच्या प्रत्येक ओघळावर कोणाचंही नियंत्रण नसतानाही त्या माध्यमातून साकारलेलं हे शीर्षकगीत संपूर्ण कलाविश्वात एक वेगळीच छाप सोडून जात आहे. मालिकेसाठी योगदान देणाऱ्या कलाकारांचंही हेच म्हणणं आहे. सॅंड आर्ट, कार्टून आर्ट, चित्रकला अशा विविध कलांच्या आणि नवनवीन संकल्पनांच्या सहाय्याने झी मराठीच्या मालिकांची शीर्षकगीतं साकारण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मालिकांची ही शीर्षकगीतं अगदी जिव्हाळ्याचाच विषय ठरत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grahan marathi serial title song making new concept ink art watch video pallavi joshi actress