मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा काही दिवसांपूर्वीच ‘सिम्बा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये सिद्धार्थने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्याच्या या भूमिकेमुळे तो सध्या विविधांगी भूमिकांना प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटामध्ये देखील तो अशाच नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार असून सध्या तो एका नववधूच्या शोधात असल्याचं दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा नवा लूक व्हायरल होत आहे. सिद्धार्थचा हा लूक त्याच्या ‘लग्नकल्लोळ’ या आगामी चित्रपटासाठी आहे. यात तो वधू -वर सूचक केंद्राचा बॅच लावून दिसत आहे, यावरून तो वधूच्या शोधात असल्याचे कळतेय. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मारुती राजाराम पाटीलची भूमिका साकारत आहे. मुळात चित्रपटाचे नाव ‘लग्नकल्लोळ’ असल्याने यात लग्न, धमाल, गोंधळ असा सगळा मसाला बघायला मिळणार आहे. मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा जितेंद्र परमार यांनी लिहिली आहे. सध्या या चित्रपटाचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरु असून वर्षाअखेरीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav new marathi movie lagnakallol ssj