प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट-नाटक विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून फुलवा खामकरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फुलवाला आतापर्यंत अनेकांनी नृत्य करताना आणि टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून अनेकांनी पाहिलं आहेत. त्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध आहे. नुकतंच फुलवाने तिच्या वडिलांच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुलवाचे वडील लेखक अनिल बर्वे यांचे ३९ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यावेळी ती पाचवीत शिकत होती. नुकतंच तिने तिच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या निधनाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने तिचे काही जुने फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आणखी वाचा : मराठमोळा अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर घेतल्या सप्तपदी

फुलवा खामकरची पोस्ट

बाबा….; आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली.मी पाचवी मधे होते.सकाळपासून खूप धडधडत होतं.आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं.बाबा गेले.मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या!

दारू मुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो? एक अत्यंत प्रतिभावान,हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारू मुळे वयाच्या अवघ्या३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला!

मात्र तुमच्या लिखाणा मुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहे याचा खूप आनंद आम्हाला होतो.अनिल बर्वे ची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे! ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाई ची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला , पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना.किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !!

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे त्तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक,ज्याचं नाव होतं फुलवा, नेहमीप्रमाणेते सगळं व्यवस्थित बुडलं,कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे.झालं भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलावाच ठेवणार ,ती नाव काढेल!हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही सामान्य माणूस या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो! मी ९ वर्षांची, राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हत! असहाय्य होतो आम्ही…

बाबा,इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता पण आता तो नाहीये! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरच खूप वाटतय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा अस काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !, असे फुलवा खामकरने म्हटले आहे.

दरम्यान फुलवा खामकर ही प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि नृत्यांगना आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. फुलवा ही १९९७ मध्ये भारतातील पहिला डान्स रिॲलिटी शो बूगी वूगीची विजेती आहे.

आणखी वाचा : ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रसाद ओक, गौरव मोरे झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

फुलवाने हॅपी न्यू इयर, जुली २, नटरंग, कुणी मुलगी देता का मुलगी आणि मितवा (२०१५) यांसारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. नटरंगमधील अप्सरा आली या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी झी गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi choreographer and dancer phulwa khamkar missing father share instagram post nrp