बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गाणारी गायिका मोनाली ठाकुरने काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला आहे. पण त्यावेळी तिने तिच्या लग्नाच्या दिवशीच पतीला देशातून बाहेर काढल्याचे सांगितले नव्हते. आता एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या पतीला विमानतळावर थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याच दिवशी बॉलिवूड सिंगर रजिस्टर ऑफिसमध्ये लग्नासाठी पतीची वाट पाहत बसली होती. आता तिने त्यादिवशी नेमके काय घडले होते याचा खुलासा केला आहे.
२०१७मध्ये मोनालीने बॉयफ्रेंड माइक रिचरशी लग्न केले होते. पण लग्नाच्या दिवशीच माइकला विजा नसल्यामुळे विमारतळावर अडवण्यात आले होते. मोनालीने दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी मायकलला विजाची गरज नसल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्याकडे जर्मनीचा पासपोर्ट होता. तो लग्नासाठी भारतात आला होता. त्यावेळी विमानतळावर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याच्याकडे विजा नसल्यामुळे माइकला दिवसभर तेथे बसावे लागले. नंतर त्याला त्याच्या देशात परत पाठवण्यात आले.
मोनालीने त्यावेळी भारत सरकारकडे मदत मागितली. संपूर्ण प्रकरण समजून सांगितल्यानंतर सरकार आणि गृहमंत्रालयाने तिला कुटुंबाप्रमाणे मदत केली. अबु धाबीला पोहोचलेल्या माइकला पुन्हा देशात बोलवण्यात आले आणि त्याचे मोनालीशी लग्न लावण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच मोनालीने लग्नबंधनात अडकल्याचे सांगितले होते. तसेच तिचे लग्न होऊन तीन वर्ष झाल्याचे देखील तिने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने, ‘माझ्या लग्नाच्या बातमीने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. कारण इंडस्ट्रीमधील कोणालाच माझ्या लग्नाविषयी माहिती नव्हती. तसेच मी लग्नालाही कोणाला बोलावले नव्हते. माझ्या मित्र परिवाला मी हे सांगितले नसल्यामुळे ते माझ्यावर नाराज असतील’ असे तिने पुढे म्हटले आहे.
मोनाली आणि माइक यांची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मोनाली माइकच्या कुटुंबीयांना देखील भेटली. त्यांच्यामध्ये चांगले बॉडिंग झाले. त्यानंतर २०१६मध्ये ख्रिसमसला माइकने मोनालीला प्रपोज केले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘दिल का फितूर’ म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता.