मे महिनाच्याचा उकाडा सरल्यावर पावसाच्या ढगांसोबतच ओढ लागते ती म्हणजे विठुरायाच्या भेटीची. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाप्रती असणारी भक्ती लक्षात घेत ‘रिंगण’ चित्रपटाचं कथानक त्याभोवती गुंफण्यात आलं आहे. ‘लॅन्डमार्क फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आईच्या शोधात असणारा, एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला दिसतो.   बाप आणि मुलातील एक वेगळाच संघर्ष यात पाहायला मिळतो. त्या लहानग्या मुलाची आईविषयी असणारी निरागस स्वप्नं आणि ही सगळी परिस्थिती सांभाळण्याचा बापाचा अट्टाहास हा सगळा प्रवास ‘रिंगण’ च्या ट्रेलर पाहायला मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरपूरच्या विठाई ला साद घालण्यासाठी ही बाप – लेकाची जोडी पंढरपूरात येऊन पोहोचते. सगळ्यांनाच मार्ग दाखवणाऱ्या या विठू माउलीच्या साथीने बाप – लेकाला कोणता मार्ग सापडतो आणि त्यावर चालताना कोणत्या अडचणी त्यांच्या वाट्याला येतात याचं सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. दुःखात असताना आपण नेहमीच चमत्कारची अपेक्षा करतो, त्याचाच आधार घेत या ट्रेलर मध्ये एक सुंदर वाक्य आहे, ‘चमत्कार होत नसतात ते आपण घडवायचे असतात.’ अशा या बाप लेकाच्या गोड आणि  भावनिक नात्याची, चमत्काराची परिभाषा नेमकी काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेलच.

शशांक शेंडे या चित्रपटात शेतकऱ्याच्या भूमिकेत असून, आपल्या अभिनयाच्या जोरावर ट्रेलरमध्ये उठून दिसणारा चेहरा म्हणजे बालकलाकार साहिल जोशी. या दोघांच्या नात्याचा अंतर्शोध घेणाऱ्या भावस्पर्शी प्रवासाचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.

चित्रपटात शशांक शेंडे आणि साहिल जोशी बरोबर उमेश जगताप आणि सुहास शिरसाट सहाय्यक भूमिकांमध्ये दिसत आहेत. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन अभिजित अब्दे यांनी केलं आहे. अजय गोगावले याने एका गाण्याला आवाज दिला आहे, ट्रेलरमध्ये या गाण्याचा काही भाग मनाचा ठाव घेतंय. प्रयत्नांनी सुटेल आत्मविश्वासाने तुटेल अशा टॅगलाईनसह हा चित्रपट ‘रिंगण’ ३० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award winning movie ringan marathi film trailer released