भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी…द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. एकापेक्षा एक दमदार डायलॉग्ज असणारा हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात भारतीय लष्कराने कशा पद्धतीने सर्व नियोजन करत सर्जिकल स्ट्राइक केला याची संपूर्ण गोष्ट उलगडणार आहे. चित्रपटातील अजून एक मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे परेश रावल. कारण परेश रावल चित्रपटात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका निभावताना दिसणार आहेत.
सर्जिकल स्ट्राइकमध्ये अजित डोवाल यांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित डोवाल नेहमीच पडद्यामागे राहून देशसेवा करण्यासाठी ओळखले जातात. परेश रावल यांनी अजित डोवाल यांच्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली असून ट्रेलरमधून ती पहायला मिळत आहे. ‘ये नया हिंदुस्तान है…ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी’, असे दमदार डायलॉग परेश रावल यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.
Proud to be playing our hero Mr Ajit Doval in film URI by Aditya Dhar. pic.twitter.com/LVfVZMoiUj
— Paresh Rawal (@SirPareshRawal) June 8, 2018
परेश रावल यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात विकी कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत असणार आहेत. विकी कौशल कमांडर इन चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. यामी गौतमने चित्रपटासाठी लूकसहित फिजिकल फिटनेसवरही विशेष लक्ष दिलं आहे. आदित्य धार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे सप्टेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर हल्ला केला होता. यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पीओकेत घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते. या अकरा दिवसांत नेमकं काय घडलं हे चित्रपटातून संपूर्ण भारतीयांना पाहायाला मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य धार यांनी दिली. ११ जानेवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.