‘बाहुबली’ सिनेमाला अफाट यश मिळालं आणि प्रभास रातोरात सुपरस्टार झाला. फक्त देशातच नाही तर जगभरात त्याला ओळख मिळाली. पण जगभरात फक्त प्रभासचेच चाहते आहेत असं नाही तर देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. जर तुम्हीही या दोघांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
‘मुन्ना मायकल’मधला नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक आऊट
या दोघांचा २००९ मध्ये आलेला ‘बिल्ला’ हा सिनेमा आता हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे निर्माते प्रभास आणि अनुष्काला मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या विचारात आहे. म्हणूनच त्यांनी ‘बिल्ला’ हा सिनेमा हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाचा हिंदी टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये प्रभास नेहमीप्रमाणे हिरोच्या भूमिकेत झळकताना दिसतो तर अनुष्काही ग्लॅमरस अवतारात बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.
या सिनेमात प्रभासची दुहेरी भूमिका आहे. हिंदीमध्ये हा सिनेमा ‘रेबल २’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा ‘बिल्ला’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या ‘बिल्ला’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. सध्या प्रभास अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहे. अमेरिकेहून परत आल्यावर तो त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’च्या चित्रीकरणाला जुलैमध्ये सुरूवात करणार आहे. सध्या या सिनेमाचे प्री- प्रोडक्शन काम सुरू आहे. तमिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. सुजीथ यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘साहो’ सिनेमात नील नितीन मुकेश याचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.