संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमातील राणी ‘पद्मावती’चे अर्थात दीपिका पदुकोणचे पहिले पोस्टर घटस्थापनेला प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्रेक्षकांसमोर आणले आहे. दुसऱ्या पोस्टरवर शाहिद कपूर साकारत असलेल्या राजा रावल रतन सिंगची प्रतिमा आहे. दीपिका पदुकोणच्या पोस्टरचे झालेले कौतुक पाहून ‘पद्मावती’च्या टीमने शाहिदचे पोस्टरही आज सकाळी प्रदर्शित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता फक्त बहुप्रतिक्षित अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणवीर सिंगचे पोस्टर येणे बाकी आहे. साहजिकच ही दोन पोस्टर्स पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. येत्या चार दिवसांमध्येच रणवीरचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शाहिदने सोशल मीडियावर त्याचा लूक शेअर करताना लिहिले की, ‘राजा रावल रतन सिंग- शौर्य, सामर्थ्य आणि सन्मानाचे प्रतीक.’ शाहिदचा हा लूक पाहून तो खरेच रावल रतनसारखा दिसतो यात काही शंका नाही. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची शाहिदची ही पहिलीच वेळ असल्यामुळे त्याने आपले सर्व कौशल्य या व्यक्तिरेखेसाठी पणाला लावले आहे. शाहिदला यापूर्वी कधीही अशा वेशभूषेत पाहिले नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक ट्रिट असेल.

असे म्हटले जाते की, शाहिदचे या सिनेमातील बहुतांश दृश्ये ही ‘शर्टलेस’ आहेत. त्यामुळे त्याने या सिनेमासाठी आपल्या शरीरयष्टीवर फार मेहनत घेतली. आपल्या सिनेमातील व्यक्तिरेखांना सुंदर आणि कलात्मक पद्धतीने सादर करण्यात भन्साळी यांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक सिनेमात ‘भन्साळी टच’ नेहमीच दिसून आला आहे. हा सिनेमा येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाचा खास लूक
या सिनेमात दीपिकाच्या लूकवर सर्वात जास्त मेहनत घेण्यात आली होती. दीपिकाचा या सिनेमातील लूक जेवढा आकर्षक आहे त्यावरुन तिला तयार होण्यास फार वेळ लागत असेल, असे तुम्हाला वाटत असेल. पण प्रत्यक्षात शुटिंगच्यावेळी तयारीसाठी सर्वात कमी वेळ दीपिकालाच लागायचा. दीपिका या सिनेमासाठी फक्त अर्ध्या तासात तयार व्हायची. नैसर्गिक पद्धतीने तिचे सौर्दंय कशाप्रकारे खुलवता येईल, यावर भर देण्यात आला. पोस्टरमधील तिच्या यूनीब्रोमुळेही ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. काहींच्या मते या जुळलेल्या भुवयांमुळे ती नैराश्यग्रस्त वाटते तर काहींनी अशा भुवया ठेवायला परवानगी देणे हे फार हिंमतीचे काम असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor slays as maharawal ratan singh in padmavati see photos