काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ ही कथाही यापैकीच एक आहे. ‘शाळा’सारख्या पुरस्कारविजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काही तरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाके आता ‘श्यामची आई’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणतो आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून सुजय सध्या ‘श्याम’चा शोध घेण्यात गुंतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या श्यामसाठी योग्य कलाकाराचा शोध सुजय घेतो आहे. त्याने राज्यभरात श्यामचा शोध घेण्याची मोहीमच सुरू केली आहे जणू…  यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं असून श्यामची ‘आई’ चित्रपटातील शीर्षक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या ८ ते १२ वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा ८ ते १२ वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वत:चा एखादा मोनोलॉग मोबाइलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२१ आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण १० मुलांची निवड केली जाईल. त्यांची मुंबईत तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. इच्छुक मुलं व पालकांनी  shyamchiaai2022 @gmail. com आणि ८७७९६२४८२२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.

‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एकापेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत सुजयनं १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रीलीजच्या माध्यमातून ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘श्यामची आई’ हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवरच आधारित असणार आहे, असेही सुजयने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shala award winners movies director sujay dahake shyam aai mother is on the silver screen akp