सध्या आपण प्रत्येक गोष्टीच्या मागे नुसते धावत आहोत. कधी करिअरसाठी तर कधी नोकरीसाठी, नोकरीनंतर स्थिरावण्यासाठी. या सगळ्या धावपळीत आपल्याला शांत व्हायला मदत करतं ते म्हणजे प्रेम. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही जगात कुठेही कितीही कामात असला तरी त्या आठवणींनी तुम्ही काही क्षणातच सुखावून जातात. आपल्या अवतीभवतीचं जग सुंदर वाटायला लागतं. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात हे आपण नेहमीच ऐकतो. पण मग प्रेमाचं काय? ते कधी कोणावर होतं हे तर खुद्द देवही सांगू शकणार नाही. त्यातही पहिलं प्रेम तर विसरणं केवळ अशक्यच. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्ही आम्ही प्रेमात पडतो. ते प्रेम यशस्वी होवो अथवा न होवो. त्या माणसाला आणि त्या आठवणींना विसरणं केवळ अशक्यच असतं. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात त्या आठवणी आपण जपून ठेवलेल्या असतात. त्या आठवणी आयुष्यभर सोबत असतात. त्या आठवणी अचानक तोंडावर हासू आणतात आणि ते जुने दिवस आठवू लागतात. अहो हे आम्ही नाही तर सतीश राजवाडेच्या ‘ती सध्या काय करते’ चित्रपटामध्ये म्हटलं आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते या चित्रपटातून लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने यावर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. लोकसत्ता ऑनलाइनने अभिनयची घेतलेली ही मुलाखत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ती सध्या काय करते’ असं तुझ्या पहिल्या चित्रपटाचं शीर्षक होतं. मग तुझ्या आयुष्यात कोणी ‘ती’ आहे की नाही?
भरपूर आहेत. अशा भरपूर आहेत त्यामुळे एखादं दुसरीचं नाव घेतलं तर त्यांना राग येऊ शकतो.

अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कसा घेतलास?
लहानपणापासून मला चित्रपट पाहण्याची आवड होती. त्यामुळे मी याच क्षेत्रात जाणार याकडे फोकस होतो. मी मोठा झाल्यावर एक कलाकार व्हावं असं बाबांनाही नेहमी वाटायचं. आईचाही हाच विचार होता. शिवाय माझी ओढही या क्षेत्राकडे पहिल्यापासूनच होती.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचं चित्रपटसृष्टीत नाव आहे. त्याच तुझ्यावर कुठे दडपण होतं का?
नक्कीच. जेव्हा तुमचे आई-बाबा एवढे मोठे स्टार असतात तेव्हा तुम्हाला खूप जबाबदारीने वागावे लागते. तुम्ही काय बोलता, कसे वागता त्याकडे लोकांचं लक्ष असतं. तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला ब-याचदा मनातच ठेवाव्या लागतात. पण त्यांनी जे काही काम केलंय त्यामुळेच आज मला चित्रपटसृष्टीत चांगलं स्वागत झालं. त्यांच्याच आशिर्वादामुळेच मला आज प्रेक्षक आणि ही इंडस्ट्री स्वीकारतेय. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्टी होती.

आज तुझे बाबा असते तर तू त्यांना काय सांगितलं असतं?
माझे बाबा हे लोकांना त्यांचा हात धरुन शिकवणारे होते. माझी इच्छा होती की त्यांनीही मला खूप गोष्टी शिकवाव्यात. त्यांची अभिनय करण्याची पद्धत, त्यांच्यातली शिस्त नक्कीच त्यांनी मला शिकवली असती. पण आज ते नाहीयेत त्यामुळे या गोष्टींसाठी मलाच लढावं लागेल. हे ही खरंय की आपण लढून जे मिळवतो ते जास्त काळ टिकतं. आज बाबा असते तर त्यांनी मला या चित्रपटाविषयी त्यांचा अभिप्राय दिला असता. माझ्या चुका काढल्या असता. पण आज ते नसल्यामुळे माझी आई मला याविषयी सांगते. तिही अभिनयात तितकीच माहिर आहे.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ti sadhya kay karte laxmikant berde son abhinay berdes interview