भगवंताच्या नऊ  अवतारांचं वर्णन केल्यावर समर्थ रामदास आता ‘मनोबोधा’च्या १२५व्या श्लोकात दहाव्या कल्की या अवताराकडे वळत आहेत. प्रथम हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ आता पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनाथां दिनां कारणें जन्मताहे।

कलंकी पुढें देव होणार आहे।

जया वर्णितां सीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।।१२५।।

प्रचलित अर्थ : अनाथ आणि दीनांच्या उद्धारासाठी देव वारंवार जन्म घेतो. पुढे कल्की रूपानं तो अवतरित होणारच आहे. त्याच्या लीला वर्णन करता करता वेदही मौनावले. असा हा देव भक्तांचा अभिमानी आहे.

आता मननार्थाकडे वळू. हा जो कल्की किंवा कलंकी अवतार आहे त्याचं पुराणांतरी असलेलं वर्णन काय आहे? तर कलियुगात पापाचा जोर कमालीचा वाढल्यावर सत्याच्या पुनस्र्थापनेसाठी भगवंताचा हा अखेरचा आणि दहावा अवतार होणार आहे. या अवताराने कलियुगाचा अंत होणार आहे, असं सनातन धर्म सांगतो. अनेकांनी तर हा अवतार आता झालाच आहे, अशा वल्गनाही केल्या आहेत. मात्र हा अवतार कसा आहे, याचं जे वर्णन विष्णू आणि कल्की पुराणात आहे ते पाहिलं की हा अवतार झाला आहे की व्हायचा आहे, हे ताडून पाहाता येईल. हा अवतार कसा आहे? तर, ‘‘सम्भल या गावी सुमती आणि विष्णुयश या मातापित्यांच्या पोटी हा अवतार होणार आहे. सुमंत, प्राज्ञ आणि कवी हे त्यांचे तीन मोठे भाऊ  असणार आहेत, तर लक्ष्मीरूपी पद्म आणि वैष्णवी शक्तीरूपी रमा या त्याच्या दोन पत्नी असतील. त्याला चार पुत्रही असतील. हा देवदत्त या शुभ्र घोडय़ावर स्वार असेल आणि त्याच्या हाती तलवार, गदा आणि पांचजन्य शंख असेल.’’ प्रभू रामांनी वैष्णोदेवीला वर दिला आहे की, कलियुगात कल्की रूपात ते प्रकटणार असून त्या वेळी ते तिच्याशी विवाह करतील. तेव्हा वैष्णवी शक्तीरूपी रमा ही त्यांची एक पत्नी असणार आहे. आता या अवताराच्या वर्णनात जाणवणारी काही रूपकं पाहू. ‘सुमती’ म्हणजे शुद्ध बुद्धी आणि ‘विष्णुयश’ म्हणजे परमात्म्याचं यशगान, गुणगान करणारा भक्त. म्हणजेच शुद्ध बुद्धी आणि भक्तीचा मिलाफ या अवताराची पूर्वअट आहे. पद्म आणि रमा यांच्याशी त्याचा विवाह झाला असेल, म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींनी तो युक्त असेल. सुमंत, प्राज्ञ आणि कवी हे त्यांचे भाऊ  असतील म्हणजेच मन, बुद्धी आणि हृदय अर्थात शुद्ध भाव यांची जोड या अवताराला जन्मत:च असेल. त्याच्या हाती ज्ञानाची तलवार, गदा म्हणजे ते ज्ञान जीवनात उतरविण्याआड येणाऱ्या आंतरिक विसंगतींचा बीमोड करण्याचं सामथ्र्य आणि पांचजन्य म्हणजे या पांचभौतिक देहातच बोधाचा निनाद आहे. आता या श्लोकांची आणखी वेगळी अर्थछटा जाणून घेऊ. समर्थ म्हणतात, ‘‘अनाथां दिनां कारणें जन्मताहे। कलंकी पुढें देव होणार आहे।’’ इथं ‘अवतार’ न म्हणता ‘जन्मण्याचा’ उल्लेख आहे आणि तो मोठा मार्मिक आहे. या जगात जो खऱ्या अर्थानं अनाथ आणि दीन झाला आहे त्याच्यासाठी हा जन्म भगवंत घेणार आहेत! आता ‘अनाथ’ आणि ‘दीन’ म्हणजे तरी काय? ज्याचे सर्व आधार सुटले आहेत तो अनाथ आहे आणि जगाच्या दृष्टीनं आवश्यक चतुराईचा ज्याच्याकडे अभाव आहे तो दीन आहे! एका अर्थी असा माणूस हा जगात कलंकित जिणंच जगणारा आहे. तर अशा कलंकी जीवापुढे भगवंत जन्मणार आहे! अर्थात मनुष्य रूपातच प्रकटणार आहेत किंवा अशा दीन आणि अनाथ जीवाच्या अंत:करणातच हा जन्म होणार आहे. अहो, वेदांनाही या विविध अवतारधारी परमात्म्याचा पाड लागला नाही, त्याचं वर्णन करता करता वेदही नि:शब्द झाले, तिथं त्याचं वर्णन कोण करणार?

 

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy