मुंबई : पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटजवळील ‘३६/४५ किलोमीटर’ हे अपघातप्रवण क्षेत्र अतिधोक्याचे झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत या ठिकाणी २८ अपघात झाले असून यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला. बहुतांश अपघात हे अवजड वाहनांचे आहेत. या अपघातप्रवण क्षेत्राचा उतार आणि त्याच्या अयोग्य रचनेमुळे या ठिकाणी चालकाचे वाहनावर नियंत्रण राहात नाही, असे महामार्ग पोलिसांनी अभ्यासात स्पष्ट झाले आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रुतगती मार्गावर बोरघाटजवळील ‘३६/४५ किलोमीटर’ या ठिकाणी मुंबईच्या दिशेने असलेल्या उतारावरच सर्वाधिक अपघात होत असल्याची माहिती महामार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या पट्टय़ात रस्त्याची रचना योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. धोकादायक उतारावर वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण राहात नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात होतात. उतारावरच ‘ब्रेक’ निकामी होण्याचे प्रमाणही वाढतच आहे. जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत ‘३६/४५ किलोमीटर’ पट्टय़ात २८ अपघात झाले. यामध्ये सात भीषण अपघातांत १० जण ठार आणि १० जण जखमी झाले होते. तर गंभीर पाच अपघांतही आठ जण जखमी असून एका किरकोळ अपघातात एक जण जखमी आहे. १५ अपघातांत एकही प्रवासी जखमी झाला नाही, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

रस्त्याची रचनाच अयोग्य..

बोरघाटजवळील या रस्त्याची रचना काहीशी योग्य नसल्याचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक, महाराष्ट्र राज्य) के. के. सारंगल यांनी निदर्शनास आणले   या संदर्भात राज्य सरकारच्या संबंधित विभागांची बैठकही झाली. या पट्टय़ातील अपघात कमी करण्यासाठी आणखी काही प्रयत्न सुरू असल्याचेही सारंगल यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 accidents in five months near borghat on mumbai pune expressway zws