३१ वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या गँगरेपप्रकरणातला आरोपी मागच्या आठवड्यात आरोपमुक्त ठरला आहे. सध्याच्या घडीला या आरोपीचे वय ६२ वर्षे आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने गँगरेप प्रकरणात आरोपी असलेल्या अब्दुल शेखची आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. ज्या मुलीवर गँगरेप झाला तिचा मृत्यू झाला आहे. तसेच पीडित महिलेचा पती आणि या खटल्यातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार या सगळ्यांचाही मृत्यू झाला आहे. तसेच या प्रकरणाचे तपास अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणातले तपशील सादर करणे त्यांना शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे अब्दुल शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पीडित महिलेवर अन्याय झाला, त्यानंतर तिचा मृत्यूही झाला मात्र तरीही अन्यायाने तिची पाठ सोडली नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

१७ सप्टेंबर १९८६ रोजी पीडित महिलेने अब्दुल शेख आणि त्याचा सहकारी सय्यद इब्राहिम या दोघांनी आपला सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला.

२८ सप्टेंबर १९८६ ला पीडित महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात गँगरेप प्रकरणी तक्रार दाखल केली.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अब्दुल शेखला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि पश्चिम आशियात जाऊन स्थायिक झाला.

१९९४ मध्ये या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी निवृत्तझाले.

२०१३ मध्ये अब्दुल शेख भारतात परतला.

३१ जानेवारी २०१४ ला या प्रकरणातला दुसरा आरोपी सय्यद इब्राहिम याचा मृत्यू झाला

१६ सप्टेंबर २०१७ ला अब्दुल शेखला पुन्हा अटक करण्यात आली व कोर्टात हजर करण्यात आले

२० नोव्हेंबर २०१७ ला अब्दुल शेखवर आरोप निश्चित करण्यात आले, मात्र आपण निर्दोष असल्याचे शेखने कोर्टाला सांगितले

७ डिसेंबर २०१७ ला पीडित महिला आणि तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचे कोर्टाने सांगितले

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अब्दुल शेखची गँगरेपच्या आरोपातून मुक्तता करण्यात आली.

पश्चिम आशियातून परतल्यावर अब्दुल शेखला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो तुरुंगातच होता. मात्र गँगरेप प्रकरणात अब्दुल शेखची आरोपांतून मुक्तता करण्यात आल्याने त्याला तुरुंगातून घरी सोडण्यात आले. शेखचे वकील तारीक खान यांनी मागच्या आठवड्यात शेखची सुटका झाल्याचे सांगितले. या प्रकरणातला दुसरा आरोपी सय्यद इब्राहीमचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात असलेली केस मागे घेण्यात आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

१७ सप्टेंबर १९८६ रोजी काय घडले होते?
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मी स्वयंपाक करत होते. तेव्हा मला घरातले रॉकेल संपल्याचे लक्षात आले. स्वयंपाक बाकी होता म्हणून मी रॉकेल आणण्यासाठी बाहेर पडले. तेवढ्यात अब्दुल शेख आणि इब्राहीम हे दोघेही माझ्या घरात शिरले. त्यांनी मला धरले आणि मला खोलीत घेऊन गेले. तिथे माझ्यावर या दोघांनीही बलात्कार केला आणि मला गप्प बसण्याची धमकी दिली. या घटनेमुळे मला प्रचंड मानसिक धक्का बसला असे या महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणात पीडित महिला, तिचा पती, दुसरा आरोपी या सगळ्यांचे मृत्यू झाल्याने आणि शेख विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्याची सुटका करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 years after rape case was filed 62 year man finally acquitted