मुंबई : मुलुंड पश्चिम येथील नानेपाडा नाल्यावरील पूल जीर्ण झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुलावरील वाहतूक शुक्रवार, ३१ जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
मुलुंड वाहतूक विभागाच्या हद्दीतील एस. एल. रोड, मुलुंड पश्चिम येथील नानेपाडा नाल्यावरील पूल जीर्ण झाला आहे. पुलावरील पदपथाचा भाग व दोन्ही बाजूचे कठडे र्जीण झाले आहेत. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शकत आहे. त्यामुळे पुलाची तातडीने पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. परिणामी, वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे नानेपाडा नाल्यावरील पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
नानेपाडा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यांयी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी या पुलाऐवजी गोशाळा मार्गाने जे. एन. मार्गाचा वापर करून व्ही. पी. मार्गाकडे जावे, तसेच व्ही. पी. मार्गाने गोशाळा मार्गाकडे दक्षिण वाहिनीने जाणाऱ्या वाहनचालकांनी जे. एन. मार्गावरून उजवे वळण घेऊन इश्चितस्थळी जावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. वरील आदेश ३१ जानेवारी २०२५ पासून १५ एप्रिल २०२६ पर्यंत लागू असतील, असेही वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबतचे आदेश उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केले आहेत.
© The Indian Express (P) Ltd