राजू परुळेकर, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेशी संबंधित चार जणांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय घोर्गे , निवृत्ती यादव, संतोष शिऊरकर आणि ईश्वर शिंदे अशी या चौघांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. खंडणीच्या या घटनेमुळे अरुण गवळीची टोळी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईतील अंधेरी येथे राहणारा करणसिंग चरणसिंग (२८) हा अभिनेता असून तो विविध मालिकांमध्ये काम करतो. ७ महिन्यांपूर्वी त्याच्या घरी घनश्याम सिंग चौहान(२४) व आदित्य सिंग(२५) हे भाडे तत्वावर राहत होते. त्यांच्यामुळेच करणसिंगची उत्तरप्रदेशातील शुभ मंगलम इव्हेन्ट कंपनीचे मालक अजय शर्मा यांच्याशी ओळख झाली. १६ ऑक्टोबर रोजी अजय शर्मा यांनी करणसिंगला फोन केला. त्यांच्या मोरादाबाद येथील मॉडर्न पब्लिक स्कुलमध्ये बालदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला एखादी अभिनेत्री प्रमुख पाहुणी म्हणून हवी, असे त्यांनी करण सिंगला सांगितले. त्यानुसार करणसिंगने अभिनेत्री अमिषा पटेल यांचे पीए अनिल जैन यांच्याशी संपर्क साधला. पाच लाख रुपयात हा करार झाला. अमिषा पटेल येणार असल्याची माहिती करणसिंगने अजय शर्माला दिली. अजय शर्माने करणसिंगला या कामासाठी ६ लाख रुपये दिले. यातील पाच लाख अमिषा पटेलला तर १ लाख करणसिंग कमिशन म्हणून घेणार होता.

अमिषा पटेल यांचे पीए जैन यांनी पाच लाख रुपये रोख दिले तर जीएसटी लागणार नाही अन्यथा जीएसटी भरावे लागेल असे सांगताच अजय शर्मा यांनी रोकडही पाठवली. अमिषा पटेल आणि जैन यांचे उत्तरप्रदेशात जाण्यासाठी १२ नोव्हेंबरचे तिकीट बुक करण्यात आले. मात्र, अमिषा तिथे गेलीच नाही. १३ नोव्हेंबर रोजी अजय शर्मा मुंबईला आले. अमिषा पटेल यांचे पीए अनिल जैन यांना विचारले असता अमिषा पटेल ही कार्यक्रमाला येणार नाही, असे त्यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी अजय शर्मा हे शेवटी पुन्हा दिल्लीला परतले.

१५ नोव्हेंबर रोजी करणसिंग त्याचा मित्र कलीम अख्तर, सुरेंद्र सूरी, पूजा फाटक यांच्यासह टॉल ग्रॉस हॉटेल, लिंक रोड, अंधेरी येथे आला होता. त्यावेळी करणला मोबाईलवर एका इव्हेंटसाठी फोन आला. फोनवरील व्यक्तींनी करणला चर्चा करण्यासाठी इन्फिनिटी मॉल अंधेरी (प) येथे बोलावले. करणसिंग त्याठिकाणी पोहोचल्यानंतर गेटवरच त्याला एका गाडीत बसवण्यात आले. ‘अमिषा पटेलसाठी घेतलेले पैसे हे आजच परत दिले तर ठीक, नाहीतर उद्या तुला १० लाख द्यावे लागतील. आम्ही अरुण गवळीची माणसे आहोत. त्यांच्यासाठी काम करतो’, असे त्या तरुणांनी धमकावले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पैशांसाठी फोन आला. शेवटी करणसिंगने मित्रासह आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठरलेल्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी चार जण आले. या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संजय घोर्गेसह चौघांना अटक केली आहे. संजय घोर्गे हा अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता आहे. पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun gawli gang active once again police arrested 4 in extortion case