मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम करीत असताना झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी आतापर्यंत उद्यान विभागाने तब्बल तीनशेहून अधिक प्रकरणात नोटीसा दिल्या आहेत. कंत्राटदारांच्या या चुकांबाबत रस्ते विभाग, पर्जन्यजलवाहिन्या विभाग अशा पालिकेच्या विभागांनाच या नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर रस्त्याचे काम सुरू असताना झाड उन्मळून पडल्यामुळे सात ठिकाणी कंत्राटदाराविरोधात पोलीसात तक्रार करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात येत आहेत. तसेच उपयोगिता वाहिन्या टाकण्यासाठी पदपथही खोदण्यात येत आहेत. त्यामुळे पदपथाच्या कडेला, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळांना धक्का लागत आहे.

अनेक ठिकाणी झाडांची मुळे कापली गेल्यामुळे झाडे कलली आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने गेल्याच आठवड्यात उपअधिक्षकांना झाडांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्या झाडांना कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे धक्का लागला आहे, मुळे कापली गेलेल्या झाडांची नोंद घेतली जात आहे. तसेच या झाडांचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रस्त्याची कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उद्यान विभागाने प्रथमच कंत्राटदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

गोरेगावमध्ये सर्वाधिक नोटीसा

ऑक्टोबरपासून रस्त्यांची कामे सुरू आहेत. ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी ३१८ नोटीसा देण्यात आल्या आहेत. रस्त्याची कामे सुरू असताना पर्जन्यजलवाहिन्या टाकणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे ही कामे देखील केली जातात. त्याकरीता रस्ता खोदताना झाडांचे नुकसान होते. त्यामुळे ज्या विभागाचे काम सुरू असताना झाडाचे नुकसान झाले त्या विभागाला या नोटीसा देण्यात आल्या आहेत. पुढे त्या त्या विभागांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी असे अपेक्षित आहे. सर्वाधिक ६४ नोटीसा या गोरेगाव परिसरात दिल्या आहेत. तर त्याखालोखाल वांद्रे पश्चिममध्ये ५५ आणि मालाडमध्ये ४५ नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाण्यात तक्रार

ज्या रस्त्याच्या कामादरम्यान झाड पडले अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मालाडमध्ये सर्वाधिक पाच प्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्व आणि पश्चिममधील प्रत्येकी एका प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी आता ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी कंत्राटदाराला नोटीस

रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या कामादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी यंदा उद्यान विभागाने कठोर पावले उचलली आहेत. प्रभादेवीमध्येही गेल्या आठवड्यात झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी रस्ते कंत्राटदाराला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली. तसेच २० हजार रुपयांचे दंड केला. प्रभादेवीतील राजाभाऊ देसाई मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना झाडांच्या मुळांना धक्का लागल्यामुळे ही कारवाई उद्यान विभागाने केली आहे. त्याआधी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करत असताना झाडाच्या बुंध्यालगत कॉंक्रीटीकरण केले म्हणून काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc garden department issue more than 300 notice for damage trees roots during concrete road work mumbai print news zws