संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : कर्नाटकातील भाजपच्या पराभवास जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांचा राज्याच्या पक्ष संघटनेतील वाढता हस्तक्षेप मानला जातो. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यापासून प्रदेशाध्यक्षांची निवड ते उमेदवारांची नावे निश्चित करण्यात  संतोष यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.  रा. स्व. संघाच्या माध्यमातून भाजपचे संघटन सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्त झालेले बी. एल. संतोष हे मूळचे कर्नाटकचे.  निवड झाल्यापासून संतोष यांनी कर्नाटक या गृह राज्यात अधिकच लक्ष घालण्यास सुरुवात केली होती.

दोन वर्षांपूर्वी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात संतोष यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. तेव्हा येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी संतोष यांच्यावर जाहीरपणे आरोप केला होता. नंतर स्वत: येडियुरप्पा यांनी इन्कार केला होता. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचा पक्षाचा निर्णय चुकल्याचे पक्षात बोलले जाते. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर येडियुरप्पा यांना हटविण्यात आले होते. पण मावळते मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कार्यकाळातही भ्रष्टाचाराचे अधिक आरोप झाले होते. प्रदेशाध्यक्षपदी नलिन कटिल यांची नियुक्ती संतोष यांच्यामुळेच झाली होती. कटिल आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता कधीच नव्हती. त्यांना बदलण्याची मागणी विविध नेत्यांनी केली असता संतोष यांनी त्याला विरोध केला होता. पक्षाचे उमेदवार ठरविण्यात संतोष यांची भूमिका महत्त्वाची होती. धारवाड मध्यमधून पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उमेदवारी नाकारण्याचे सारे खापर हे संतोष यांच्यावर फोडले होते.  भाजपच्या रचनेत संघटन सरचिटणीसपद हे महत्त्वाचे पद मानले जाते. पंतप्रधान मोदी, अमित शहा वा पक्षाध्यक्ष नड्डा यांच्यानंतर पक्षात संतोष यांचे स्थान आहे. मोदी-शहा यांनी कर्नाटकच्या कारभारात संतोष यांना झुकते माप दिले पण त्यातून असंतोष निर्माण झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction with bl santosh ambitions in the party responsible for bjp defeat reasons ysh