१३ वर्षांपासून मार्गिकेचे काम अपूर्णच; सहाव्या मार्गिकेलाही फटका
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली पाचवी, सहावी मार्गिका गेल्या १३ वर्षांपासून रखडली असून पाचव्या मार्गिकेतील दादर ते सांताक्रुझ हा पट्टा अद्यापही अपूर्णच आहे. अतिक्रमण, जागेची कमतरता यामुळे या पट्टय़ात कामे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. पाचवी मार्गिका रखडल्याने सहाव्या मार्गिकेच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे.
मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका उभारून मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेने घेतला. यामुळे या पट्टय़ातून जाताना अप, डाऊन जलद लोकल गाडय़ांचेही वेळापत्रक सुरळीत राहू शकेल. यासाठी २००८-०९ साली मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली पाचव्या, सहाव्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेसाठी ९१८ कोटी ५३ लाख रुपये तरतूद करण्यात आली होती.
मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली या पट्टय़ात पाचव्या, मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई सेन्ट्रल ते दादपर्यंतही कामे पूर्ण केली आहेत. मात्र दादर ते सांताक्रूझपर्यंत पाचवी मार्गिका अद्यापही तयार झालेली नाही. वांद्रे, खार, सांताक्रूझ येथे या मार्गिकेच्या जागेवर अतिक्रमणे आहेत. वांद्रे येथे दफनभूमी असून ती स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम रखडले आहे. पाचव्या, सहाव्या मार्गिकेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी वांद्रे ते खार दरम्यान असलेला जुना पूल पाडून त्याच्या बाजूलाच नवीन रेल्वेपूल उभारला जाणार आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. त्याचा खर्च ८७ कोटी रुपये असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.
प्रकल्प खर्चात वाढ
प्रकल्प मंजूर झाला त्यावेळी ४३० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता याच प्रकल्पाची किंमत ९३० कोटी रुपये झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली पाचवा, सहावा मार्गही एमयूटीपीचाच भाग असून ही मार्गिका पश्चिम रेल्वेकडून निर्माण केली जात आहे. राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षांत एमयूटीपी प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका या मार्गिकेलाही बसला आहे.
सहाव्या मार्गिकेचे काम सुरू
सहाव्या मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले येथील रेल्वे वसाहतींचीही जागा लागणार आहे. विलेपार्ले येथे नऊ इमारतींसह एकूण १०२ घरे असून त्यातील ९९ घरे रिकामी करण्यात आली आहेत. नऊ इमारतींपैकी सात इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण होताच रुळांसह अन्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.