मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सन २०००पासून ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ संस्था काम करत आहे. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून देशभर विज्ञान शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

या संस्थेने महाराष्ट्रात विविध ठिकाणी दहा हजार वृक्ष लावण्याचा ध्यास घेतला आहे. तसेच सैद्धांतिक शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे निरनिराळ्या वैज्ञानिक संकल्पना समजाव्यात आणि प्रत्यक्षपणे विविध उपकरणे हाताळून निरीक्षण करता यावे यासाठी, ‘बाल विज्ञान संशोधिका’ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच विविध गावांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘चालती – फिरती प्रयोगशाळा’ पोहोचवून विविध वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे स्पष्ट करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अपुरे मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी कार्यालय नसतानाही विज्ञान प्रसाराचा हा प्रवास सुरूच आहे. त्यामुळे विज्ञान प्रसाराच्या या प्रवासाला बळकटी मिळण्यासाठी आणि भविष्यात विद्यार्थीकेंद्रित विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या संशोधनात्मक प्रकल्पांवर आधारित ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ या उपक्रमाची मुंबईत सुरुवात करण्यासाठी ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ या संस्थेची २००० साली बाळासाहेब जाधव यांनी स्थापना केली. सध्या ही संस्था ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ या उपक्रमाची मुंबई जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि राज्याच्या शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी संवादात्मक विज्ञान कार्यशाळा, परिषदा आणि विविध चर्चासत्रांचे आयोजनही सातत्याने करत असते. विद्यार्थ्यांसह इतरांमध्ये विज्ञान शिक्षण व जागरूकता वाढविण्यासाठी शैक्षणिक साहित्य, पुस्तिका, चित्रफिती आणि ऑनलाइन मजकुराची निर्मिती करण्याचे कामही संस्था करते.

सध्या एका छोट्याशा घरातून ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ ही संस्था विज्ञान प्रचार व प्रसारासंबंधित विविध उपक्रमांचे नियोजन करत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांचे व्यवस्थित नियोजन व आयोजन करण्यासाठी संस्थेला स्वतंत्र मोठे कार्यालय सुरू करायचे असून त्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. या आर्थिक मदतीतून विज्ञान प्रसारावर आधारित विविध उपक्रम राबविण्याचाही संस्थेचा मानस आहे.

“आर्थिक बळ आणि कार्यालयीन सुविधा नसल्याने खूप मर्यादा येतात. परिणामी, अनेकदा उत्तमरीत्या चाललेले उपक्रम स्थगित करावे लागतात. तसेच नवीन उपक्रम सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु तरीही केवळ विज्ञानाची तीव्र आवड, जिद्द, परिश्रम आणि सातत्य या गोष्टींच्या आधारावर ही छोटी संस्था मोठे काम करत आहे. आम्हालाही चांगले प्रायोजक किंवा दानशूर आश्रयदाते मिळाले तर संस्थेचे काम एका वेगळ्या उंचीवर नेता येईल.” – बाळासाहेब जाधव, संस्थापक अध्यक्ष, नवनिर्माण विज्ञान प्रबोधन

बँकिंग पार्टनर दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.