मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घसरती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी भाषेच्या अस्मितेचे पाठीराखे असल्याची टिमकी सातत्याने वाजविणाऱ्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली असून विद्यार्थी संख्येमध्ये पालिकेच्या मराठी शाळा तिसऱ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. तुलनेत संख्येने कमी असलेल्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली असून विद्यार्थी संख्येमध्ये उर्दू शाळांनी आघाडी घेतली आहे.

गोरगरीब शाळांमधील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी पालिकेने मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी अशा आठ माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर १७ आव्हानात्मक शाळा आणि ६० मुंबई पब्लिक स्कूलही सुरू केल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घसरणीला लागली होती. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने आग्रहाने त्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना राबविण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र तरीही विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरतच असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकेकाळी पालिकेच्या मराठी शाळांमध्ये मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यास येत होते. परंतु मुंबईतून हळूहळू हद्दपार झालेला मराठी टक्का, कॉन्व्हेन्ट शाळांकडे वाढता कल आदी विविध बाबींमुळे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली. मात्र तरीही इतर माध्यमांच्या तुलनेत मराठी शाळांनी आघाडीचे स्थान सोडले नव्हते. मात्र काही वर्षांपासून मराठी शाळांना उतरती कळा लागली आहे. २०१६ मध्ये अन्य माध्यमांतील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. विद्यार्थी संख्या वाढलेल्या उर्दू शाळांनी आघाडी घेतली आहे, तर पटसंख्येत हिंदी माध्यमांतील शाळांनी दुसरे स्थान पटकावले आहे.

पटसंख्येत सध्या आघाडीवर असलेल्या उर्दू माध्यमाच्या २०१ शाळांमध्ये ८३,१२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २३० हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये ८१,१२९ विद्यार्थी आहेत.

मराठी माध्यमाच्या ३२८ शाळा असून विद्यार्थ्यांची  पटसंख्या ४७,९४० इतकी आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास पालिका असमर्थ ठरू लागली आहे. कॉन्व्हेन्ट शाळांमुळे होणारी विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी पालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. मात्र पालिकेच्या अन्य माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत इंग्रजी शाळा विद्यार्थी पटसंख्येच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of bmc marathi schools bmc urdu schools