मुंबई : मुंबईतील पहिला स्कायवॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व स्कायवॉकची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालयापर्यंतच्या टप्प्याची उभारणी मुंबई महानगर पालिका करणार असून जुन्या स्कायवॉकचे पाडकाम याआधीच पूर्ण झाले आहे. आता नवीन स्कायवॉकच्या बांधकामाला ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात येणाऱ्या एसआरए कार्यालय ते कलानगर जंक्शनदरम्याच्या जुन्या स्कायवॉकच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी पालिकेने वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे स्थानक ते मुख्य रस्ता असा प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीएने स्कायवॉक प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाअंतर्गत २००८ मध्ये पहिला वांद्रे पूर्व स्थानक ते कलानगर जंक्शन स्कायवॉक खुला करण्यात आला होता. पुढे एमएमआरडीएने मुंबईत अनेक स्कायवॉक बांधून देखभालीसाठी पालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र मुंबईतील पहिल्या स्कायवॉकचा पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाणारा भाग एमएमआरडीएने कलानगर ते वांद्रे-वरळी सागरी सेतू उन्नत मार्गासाठी पाडला. त्यामुळे वांद्रे स्थानक ते कलानगर हा टप्पा पादचाऱ्यांसाठी बंद झाला. त्याचवेळी वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालय या टप्प्याची पुरती दुरावस्था झाली. स्कायवॉकचे दोन्ही टप्पे धोकादायक झाले.

या पार्श्वभूमीवर स्कायवॉक पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील प्रवाशी आणि पादचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता स्कायवॉकच्या पुनर्बाधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालय टप्प्याची पुनर्बाधणी पालिका आणि एसआरए कार्यालय ते कलानगर जंक्शन टप्प्याची पुनर्बाधणी एमएमआरडीए करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalanagar skywalk rebuilding work started soon zws