पुरस्कार सोहळ्यात वैचारिकता, शहाणपण आणि सामर्थ्यांची अनुभूती
अन्याय, उपेक्षेच्या विरोधात संघर्षांचा पवित्रा घेऊन उभी राहणारी स्त्रीशक्ती समाजाने कित्येकदा अनुभवली आहे. पण रोजच्या जगण्यातून, अनुभवातून आलेले शहाणपण, वैचारिक प्रगल्भता आणि अंगी असलेल्या सामर्थ्यांच्या बळावर दुसऱ्यांसाठी भव्य कार्य उभारणाऱ्या कर्तृत्ववान ‘नवदुर्गा’ची शक्ती उपस्थितांना थक्क करून गेली. निमित्त होते, लोकसत्ता आयोजित ‘शोध नवदुर्गाचा’ उपक्रमातून निवडलेल्या दुर्गाच्या सत्काराचे!
राज्यभरात अनेक ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कार्य उभारणाऱ्या या नऊ ‘दुर्गा’चा सन्मान लोकसत्ताच्या या उपक्रमातून करण्यात आला. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिराच्या भरगच्च सभागृहात रंगलेला हा ‘नवदुर्गा’चा जागर नवी ऊर्जा देणारा ठरला. लोकसत्ता आयोजित, अभ्युदय को. ऑप. बँक प्रस्तुत, केसरी सहप्रायोजित ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाचे हे दुसरे पर्व होते आणि ते उत्साहात पार पडले.
समाजात जे जे पूजनीय आहे, त्याची नेहमीच अक्षम्य हेळसांड केली जाते. स्त्रीशक्ती देखील त्याला अपवाद नाही. नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेला फाटा देत विधायक कार्य उभे करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा, या विचारातून ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाची सुरुवात झाल्याचे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. या उपक्रमातून सत्कृतीने संस्था आणि माणसे जोडली जातात. सत्कार्याचाही दबाव निर्माण व्हायला हवा आणि तो या उपक्रमातून साधला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सोलापूर येथे अनाथ मुलांसाठी पाखर संकुल उभारणाऱ्या शुभांगी बुवा, जव्हारमध्ये आदिवासी आणि कर्णबधीर मुलांसाठी शाळा उभारणाऱ्या प्रमिलाताई कोकड, गोंदियासारख्या दुर्गम भागात जंगल तस्करी करणाऱ्यांविरोधात उभे राहून ७०० एकर जंगल वाचवणाऱ्या उषा मढावी यांसारख्या महिलांनी स्वबळावर उभारलेल्या कार्याची माहिती ऐकून उपस्थित अचंबित झाले.
वाचाल तर वाचाल, ही म्हण कृतीतून प्रत्यक्षात आणणाऱ्या आणि वाचनातून मिळालेल्या वैचारिक धनामुळे विधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, त्यांचे पुनर्विवाह घडवून आणणाऱ्या नगर जिल्ह्य़ातील बेबीताई गायकवाड; प्राण्यांमध्ये कुठलाही जाती-वर्ण भेद नसतो हे मानणारी आणि त्याच श्रद्धेने रस्त्यावर भटकणाऱ्या जखमी प्राण्यांना नवसंजीवनी देणारी तरुण डॉक्टर अंकिता पाठक; मतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी झगडणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील आणि मेळघाटातील आदिवासींमध्ये राहून बांबूच्या वापरातून त्यांच्यासाठी रोजगार निर्मिताचा मार्ग दाखवणाऱ्या निरूपमा देशपांडे यांची उदाहरणे सामाजिक बांधिलकीतून केवढे मोठे कार्य उभारता येऊ शकते, याची प्रचीती देणारी ठरली.
स्वत: अपंग असूनही स्वबळावर उभे राहणाऱ्या मनाली कुलकर्णी आणि आपल्याच पगारातून अपंग खेळाडूंना तयार करणाऱ्या पंढरपूर येथील मीनाक्षी देशपांडे याही खऱ्या अर्थाने दुर्गेचे प्रतीक ठरल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले, तर मिती क्रिएशनच्या श्वेता पडवळ व कलाकार, अमृता काळे, नचिकेत देसाई, अद्वैता लोणकर या कलाकारांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करून या सोहळ्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मान्यवरांची कौतुकाची थाप : नवरात्रीतील प्रत्येक देवीच्या रूपाशी जोडल्या गेलेल्या नऊ दुर्गा आणि त्यांच्या कार्याची ओळख, हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ ठरले. या ‘नवदुर्गा’चा सन्मान करण्यासाठी शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर, अभिनेत्री ज्योती सुभाष, उद्योजिका अचला जोशी, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. शुभांगी पारकर आणि गीतांजली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta honored nav durga