मुंबई : राज्यामध्ये मागील चार महिन्यांमध्ये हिवतापाचे २ हजार ७२६ रुग्ण सापडले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, मात्र मागील वर्षी याच चार महिन्यांत हिवतापाचे २ हजार ८६७ रुग्ण सापडले होते आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता, असे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये हिवताचा प्रकोप काही अंशी कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने हिवतापाचे धोके, प्रतिबंध, उपाय याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. सार्वजनिक आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी – एप्रिल २०२४ या काळात हिवतापाचे २ हजार ८६७ रुग्ण सापडले होते, तर चौघांचा मृत्यू झाला होता. यंदा या कालावधीमध्ये हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत काही अंशी घट झाली असून, जानेवारी – एप्रिल २०२५ दरम्यान हिवतापाचे २ हजार ७२६ रुग्ण सापडले आहेत. मात्र यंदा अद्यापपर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, यंदा हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये सापडले आहेत. मुंबईमध्ये हिवतापाचे १ हजार ४१३ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल गडचिरोलीमध्ये ७८१ रुग्ण, रायगडमध्ये २५० रुग्ण सापडले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

तीन वर्षांत मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ

मागील तीन वर्षांत मुंबईमध्ये सातत्याने हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये १३ लाख ६० हजारांहून अधिक नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली. या चाचणीत हिवतापाचे ३ हजार ९८५ रुग्ण सापडले. २०२३ मध्ये १३ लाख ९८ हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यात हिवतापाचे ७ हजार ३१९ रुग्ण सापडले. २०२४ मध्ये १५ लाख १० हजार रक्त नमुने तपासण्यात आले. यामध्ये ७ हजार ९३९ रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेची सर्वेक्षण मोहीम

मुंबईमध्ये अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या प्रशासकीय विभागाच्या ठिकाणी ”फोकाय बेस्ड १-३-७ स्ट्रॅटेजी”चा अवलंब करण्यात आला आहे. या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी हिवतापाचे रुग्ण शोधणे, तिसऱ्या दिवसापर्यंत सहवासितांचे सर्वेक्षण करणे, सातव्या दिवसात रुग्ण सापडलेल्या भागात सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते. त्याचप्रमाणे डासांच्या उत्पत्तीस्थानांचा ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन

हिवताप नियंत्रण करण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, तसेच महानगरपालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये येथे तापाच्या रुग्णांकरीता आवश्यक निदान व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित उपचार व वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच खासगी डॉक्टरांनी हिवताप रुग्ण आढळल्यास संबंधित विभागीय आरोग्य अधिकारी यांना संपूर्ण माहितीसह त्वरित तपशील कळवावा. तसेच रुणांनी हिवतापाचे उपचार अर्धवट सोडू नये, असे आवाहन जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaria in the maharashtra 2726 patients in four months highest number of 1400 patients in mumbai mumbai print news ssb