मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले.

विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली.

दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor avinash kharshikar passed away ssj