झगमगता डान्स फ्लोअर.. त्यावर थिरकणारी पावले.. काचेच्या ग्लासची किण्किण्.. त्या ग्लासमध्ये मद्य ओतल्याचा आवाज.. एकापेक्षा एक खमंग पदार्थाची रेलचेल.. मंगळवारी रात्री मुंबईत पाटर्य़ाचा महापूर येणार आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांपासून ते वेगवेगळ्या क्लब्जपर्यंत सगळीकडेच ‘थर्टीफर्स्ट नाइट’ची धूम आहे. अडीच हजार रुपयांपासून ते अगदी १६ हजार रुपयांपर्यंत कपल आणि सिंगल एण्ट्री असलेली ही सगळी हॉटेल्स आणि क्लब्ज ‘सेलिब्रेशन’साठी सज्ज आहेत.
सरत्या वर्षांच्या रात्रीला एका वेगळ्याच धुंदीत अलविदा करण्यासाठी आणि त्याच नशेत नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील तरुणाई विविध पब्ज आणि हॉटेल्समधील ‘न्यू इयर पार्टी’ला हजेरी लावते. गेल्या काही वर्षांमध्ये तर या पाटर्य़ाच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. दक्षिण मुंबईतील आलिशान हॉटेल्स आणि पब्जपासून ते अंधेरी, गोरेगाव ते पार ठाणे, नवी मुंबई येथपर्यंत विविध पब्ज आणि हॉटेलांमध्ये डीजे, दारू आणि खानपान सेवा पुरवत या पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत यंदा ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल अडीच हजार पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी हार्ड रॉक कॅफे, कोर्टयार्ड मॅरिएट, ड्रंकन मंकी, हॉटेल मरिन प्लाझा, द ललित, हॉटेल वेस्ट इन अशा हॉटेल्स व पब्जमधील पाटर्य़ाना भलताच प्रतिसाद आहे. मास्क अप अ‍ॅट काउंटडाउन, व्हिवा लास वेगास, ग्लो थीम पार्टी, एक्स्ट्राव्हॅगण्ट, अ‍ॅमेझॉन अशा विविध थीम्सनी या पार्टीज्ना रंगत येणार आहे.
या पार्टीज्साठी एण्ट्री फी म्हणून अडीच हजार रुपयांपासून ते दहा जणांच्या टेबलसाठी ३२ हजार रुपयांपर्यंतचे दर आहेत. यापैकी काही क्लब्जमध्ये या शुल्कात ‘रिचवाल तेवढे मद्य व पचवाल तेवढे जेवण’ यांचाही समावेश आहे. प्रत्येक क्लबनी काही खास ऑफर्स देत गर्दी आपल्याकडे खेचण्याची तयारी केली आहे. यात कपल्ससाठी खास दर, एकाच पासमध्ये दोन झोन्समध्ये प्रवेश अशा काही ऑफर्सचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमआयजी’वरील पार्टी मात्र रद्द
खेळाच्या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही पालिकेने वांद्रे येथील एमआयजी क्लब मैदानावर नववर्षांच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यास परवानगी दिली होती. मात्र शिवसेना नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी विधी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविताच पालिकेने दिलेली परवानगी रद्द केली. परिणामी आदल्या दिवशी पार्टी रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. एमआयजी क्लब मैदान हे खेळांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथे कोणतेच मनोरंजनपर अथवा व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करता येत नाहीत. न्यायालयाने या मैदानात कोणतेही मनोरंजनपर अथवा व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश २००७ मध्ये दिले होते. मात्र असे असूनही जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai city ready for new year celebration