बोगद्यातील गळतीवर मध्य रेल्वेचा उपाय; ‘सीएमआरआय’ची सूचना फेटाळली
पावसाळा संपून अनेक महिने उलटून गेले, तरी पारसिक बोगद्यात होणारी पाण्याची गळती थांबली नसून हा प्रकार धोकादायक असल्याचा अहवाल केंद्रीय खाण संशोधन संस्थेने (सीएमआरआय) मध्य रेल्वेला दिला आहे. मात्र या अहवालात संस्थेने सुचवलेला गळती रोखण्याचा उपाय मध्य रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळत आता बोगद्यात पाच मि.मी. जाडीचे सिमेंटचे छत बांधण्याचे ठरवले आहे. या छतामुळे प्रवाशांच्या अंगावरील पाण्याचा वर्षांव टाळता येईल, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र, गळती थांबवली नाही, तर या डोंगराचा दगड धसण्याची शक्यता भू-अभ्यासक व्यक्त करत आहेत.
गेली अनेक वर्षे पारसिक बोगद्यावर असलेल्या लोकवस्तीतून आणि डोंगरातील पाण्याच्या स्रोतांमधून दगडांत झिरपणारे पाणी बोगद्यात पडते. मात्र गेल्या दोन वर्षांत बोगद्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने मध्य रेल्वेने बोगद्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. हे काम रेल्वेने नागपूरच्या केंद्रीय खाण संशोधन संस्थेकडे सोपवले होते. या संस्थेने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालात बोगद्यात होणारी गळती रोखण्यासाठी पाण्याचे स्रोत शोधून ते बंद करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पाणी गळण्याच्या जागा बंद केल्या, तरी ते पाणी दगडांत झिरपत राहील आणि त्याचे परिणाम भयंकर असतील. त्यामुळे आम्ही सीएमआरआयची सूचना बाजूला ठेवल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
त्याऐवजी मध्य रेल्वे आता पूर्ण पारसिक बोगद्यात छताखाली काही अंतरावर पाच मि.मी. जाडीचे सिमेंटचे आवरण बसवणार आहे. त्यामुळे हे पाणी त्या सिमेंटच्या आवरणावर पडून खाली येईल आणि प्रवाशांवर पाण्याचा वर्षांव होणार नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील पूर्व मुक्तमार्गावरील एका बोगद्यात हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
मात्र, रेल्वेने पाच मिमी जाडीचे कवच उभारले, तरी गळती कायम राहणार आहे. ही गळती दगड ठिसूळ करू शकते. भविष्यात त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कवच उभारणे हा तात्पुरता उपाय असल्याचे भूअभ्यासक आणि रिमोट सेन्सिंग तज्ज्ञ प्रणव टिल्लू यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीसी-एसी परिवर्तनाचे काय?
डीसी-एसी परिवर्तन करताना ओव्हरहेड वायर आणि बोगद्याचे छप्पर यांत ठरावीक अंतर ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी मध्य रेल्वेने बोगद्यात रेल्वेरुळांची पातळी खाली केली. परिणामी बोगद्यातून जाणाऱ्या गाडय़ांना कायमस्वरूपी वेगमर्यादा लावण्यात आली आहे. आता छताखाली आणखी पाच मि.मी. जाडीचे दुसरे छप्पर बसवले, तर ओव्हरहेड वायर आणि त्यातील अंतराचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parsik tunnel water leakage