अक्षय मांडवकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तस्करी रोखण्यासाठी कोकणात अभिनव उपक्रम

खवले मांजरांच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने उघड होत असताना चिपळूण तालुक्यात खवलेमांजरांच्या बिळांवर नजर ठेवण्याकरिता संशोधकांनी ‘सह्य़ाद्री’ नामक अ‍ॅपची मदत घेतली आहे. या अ‍ॅपवर खवले मांजरांच्या बिळांची ठिकाणे (लोकेशन) आणि त्यासंबंधीची माहिती नोंदवून त्यावर ‘कॅमेरा ट्रॅप’च्या मदतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांत येथे आढळलेल्या १५ बिळांची नोंद अ‍ॅपवर करण्यात आली आहे. या बिळांचे तस्करांपासून संरक्षण व्हावे म्हणून संशोधकांनी वन विभागाच्या मदतीने नजर ठेवली आहे.

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ‘ट्रॅफिक’ या संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार २००९ ते २०१७ या काळात भारतात ५ हजार ७७२ खवले मांजरांची शिकार झाली. खवले मांजरांचे जप्त केलेले खवले आणि काही जिवंत मांजरांच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यात आढळणाऱ्या खवले माजरांवर सखोल संशोधन करण्याचे काम जानेवारी २०१६ पासून चिपळूणच्या ‘सह्य़ाद्री निसर्ग मित्र’ या संस्थेकडून होत आहे. या प्राण्यांच्या खवल्यांपासून औषधनिर्मिती केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खवले माजरांना मोठी किंमत मिळते. त्यामुळे कोकणातून होणारी या प्राण्यांची तस्करी रोखण्याकरिता संशोधकांनी आता तंत्रज्ञानाचा आसरा घेतला आहे. दोन्हीं तालुक्यामधील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये ३० कॅमेरा ट्रॅप लावून खवले मांजरांच्या वावरावर नजर ठेवली जात आहे.

संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यामध्ये गावातील जुने शिकारी आणि जाणत्या गावक ऱ्यांच्या मुलाखती घेऊन खवले मांजरांच्या बिळांची आणि त्यांच्या वावराच्या ठिकाणांची माहिती घेण्यात आल्याचे ‘सह्य़ाद्री निसर्ग मित्र’चे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले.

सध्या कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने त्यांची संख्या मोजण्याकरिता बिळांवर नजर ठेवण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीस वर्षभर बिळानजीक खवले मांजरांच्या हालचालींची नोंद झाली नाही. मात्र, वर्षभरानंतर खवले मांजरांचा वावर सुरू झाल्यावर आजतागायत ७० ते ८० वेळा त्यांची छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. या माध्यमातून मिळालेली माहिती संकलित करण्यासाठी ‘सह्य़ाद्री’अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली.आढळलेल्या बिळाचे ठिकाण (लोकेशन), वेळ, तारीख, लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याचा कालावधीची नोंद या अ‍ॅपमध्ये करण्यात येते.

बिळांची ठिकाणे दुर्गम भागात असल्याने त्याची नोंद करताना बऱ्याचदा मोबाइलमध्ये नेटवर्कची समस्या येते. मात्र तरीही या अ‍ॅपमध्ये माहितीचा संचय होतो, असे काटदरे यांनी सांगितले.

खवले मांजरांची वाढती तस्करी लक्षात घेता सह्य़ाद्री निसर्ग मित्र संस्थेकडून सुरू असलेले संशोधनाचे काम महत्त्वाचे आहे.  या संशोधन प्रकल्पामुळे चिपळूण भागातून होणाऱ्या खवले मांजरांच्या तस्करीला आळा बसण्यास मदत होत आहे. शिवाय या प्राण्याची तस्करी करून उपजीविका करणाऱ्या कातकरी समाजासाठी जनजागृती कार्यक्रम आणि विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

-एम.के.राव, साहाय्यक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम परिक्षेत्र

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protecting the manis cat by app