उच्च न्यायालयाची ‘बिहारी फ्रंट’ला विचारणा
छटपूजेसाठी ‘सेलिब्रेटीं’ची गरज काय, असा सवाल उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस काँग्रेस नेते संजय निरुपम सदस्य असलेल्या ‘बिहारी फ्रण्ट’ या संघटनेला केला.
जुहू चौपाटीवर १७ व १८ नोव्हेंबर छटपूजेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला चौपाटीवर पूजा करण्यास तसेच धार्मिक विधींसाठी व्यासपीठ उभारण्यास परवानगी दिली होती. मात्र ‘सेलिब्रेटीं’ना बोलावण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला नकार दिला होता. त्यामुळे संघटनेने या निर्णयाविरोधात नव्याने याचिका केली आहे. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर सुनावणी झाली.
त्या वेळेस छटपूजेसारख्या सणांसाठी ‘सेलिबेट्रीं’ची गरजच काय, असा न्यायालयाने संघटनेला हा सवाल केला; परंतु त्यावर छटपूजेसाठी केवळ माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी यांना बोलावले आहे आणि त्या ‘सेलिब्रेटी’ नाहीत, असे संघटनेच्या वतीने अ‍ॅड्. अनिरुद्ध गर्गे यांच्याकडून न्यायालयाला सांगण्यात आले.
शिवाय गेल्या १८ वर्षांपासून संघटनेतर्फे हा सण जुहू चौपाटीवर साजरा करत असून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन केले नसल्याचा आणि कुठल्याही प्रकारच्या अटी घालण्यात आलेल्या नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
‘सेलिबेट्रीं’ना बोलवायचे की नाही हा संघटनेचा निर्णय आहे. त्यामुळे एकदा का परवानगी दिल्यानंतर त्याबाबत अटी घातल्या जाऊ शकत नाही, असा दावा संघटनेने याचिकेत केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने छटपूजा प्रकरणाची सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने ‘मन रंगलो’ या संघटनेला जुहू चौपाटी येथे छटपूजेस परवानगी दिली होती. मात्र त्याच वेळेस घातल्या जाणाऱ्या नाचगाण्यांच्या धिंगाण्यावर बंदी घालण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do you want celebrities for chhath puja ask mumbai high court