नागपूर : पाच वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्यामुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील ‘जाई’ नावाच्या वाघिणीला मृत्यूची वाट पत्करावी लागली. आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. या प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात चक्क नागोबाने प्रवेश केला. कर्मचाऱ्यांना ते लगेच निदर्शनास आले आणि त्यांनी नागाला बाहेर काढले. मात्र, या घटनेमुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालय चालवणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या बेजबाबदार कार्यशैलीवर टीका होत  आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक महिन्यापूर्वी महाराजबाग प्राणीसंग्रहालय परिसरात धामण साप दिसला. त्यालाही प्रशासनाने ‘रेस्क्यू’ केले. त्यानंतर आता वाघाच्या पिंजऱ्यात चक्क नागोबा अवतरले. यावेळी वाघ लहान पिंजऱ्यात असल्याने त्याचा जीव वाचला. लहान पिंजऱ्यालगतच्या खुल्या पिंजऱ्यातील छोट्या कृत्रीम पाणवठ्यावर या नागाने आपले बस्तान बसवले. कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली, पण त्याला ‘रेस्क्यू’ करणे इतके सोपे नव्हते.

हेही वाचा >>> “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस…”, दोन आठवड्यांत मागितले उत्तर

तीन ते चार तासाच्या  प्रयत्नानंतर त्यांना यश आले. त्यानंतर त्याला जंगलात दूर सोडण्यात आले. मात्र, या घटनेने हे प्राणीसंग्रहालय चालवणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या वन्यप्राण्यांच्या बाबतीत असलेली बेफिकिरी वृत्ती उघड झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये याच प्राणीसंग्रहालयातील ‘जाई’ नावाच्या वाघिणीला सापाने दंश केला होता. सर्पदंशानंतर  तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. महिनाभरातच तिचा मृत्यू झाला. ‘जाई’च्या मृत्यूनंतर महत्प्रयासाने प्रशासनाने ३० ते ४० हजार रुपये खर्चून बारीक जाळी लावली. त्यालाही आता पाच ते सहा वर्ष लोटले. त्यामुळे ही जाळी पूर्णपणे सडली आहे. महिनाभराआधी धामण साप दिसला तेव्हाच या जाळीचा प्रश्न समोर आला होता.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव थांबवा, अनिल देशमुख यांचे फडणवीस यांना पत्र

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानेही वारंवार कृषी महाविद्यालयाला सांगितल्यानंतरही प्रशासनाने काहीच केले नाही.. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांवर ओढवली आहे. यासंदर्भात महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांना विचारले असता याठिकाणी लावलेली जाळी सडली आहे. नवीन जाळी लावण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकरच मंजूर होईल आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी येथे जाळी लावली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A snake entered the tiger cage in the zoo nagpur rgc 76 ysh