अकोला : अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील प्रसिद्ध समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या बुलढाण्याची सून होणार आहे. बुलढाण्यातील एका युवकाने मुलीला मागणी घातली. शंकरबाबांनी मुलाची सविस्तर माहिती घेऊन मुलीच्या पसंतीने लग्नाला परवानगी दिली. वधू मंडपी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक भवनात हा विवाह सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. बाबाच्या या मानसकन्येचे कन्यादान वडील म्हणून जिल्हाधिकारी एस. राममूर्ती दाम्पत्य करणार आहेत, तर मुलीचे मामा म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे उपस्थित राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंकरबाबा पापळकर यांची २५ वी मानसकन्या दीपाली ही मूकबधिर आहे. बुलढाणा येथील आशीष बिहारीलाल जांगिड यांनी दीपालीला पसंत केले. आशीष हे मागील अनेक वर्षांपासून बुलढाण्याचे रहिवासी असून ते देखील मूकबधिर आहेत. शंकरबाबा यांच्या आश्रमात त्यांची मुलीसोबत भेट झाली. आपला जोडीदार आपल्यासारखाच असावा, आपले सुख-दु:ख समजून घेणारा असावा व तिचे देखील दु:ख समजावे, या हेतूने आशीष जांगिड यांनी दीपालीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह आश्रमातच होणार होता. मात्र, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राध्येश्याम चांडक यांनी शंकरबाबांना दीपाली जशी तुमची मुलगी आहे, तशीच माझी मुलगी आहे, तिचा विवाह, राष्ट्रीय महोत्सवासारखा वधू मंडपी पार पाडू, असे सांगितले. अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध असल्याने शंकरबाबांनी देखील त्यांना विरोध केला नाही. आता या विवाहाची तयारी सुरू आहे. या विवाह सोहळ्यात जिल्हाधिकारी एस. राममूर्ती हे वडील म्हणून दीपालीचे कन्यादान करणार आहेत. मुलीचे मामा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे उपस्थित राहतील. या विवाह सोहळ्यात प्रामुख्याने अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, बुलढाणा अर्बन परिवाराचे डॉ. सुकेश झंवर, कोमल झंवर यांच्यासह अनेक मान्यवर विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा दिमाखदार पद्धतीनेच होणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लक्ष आता या महोत्सवाकडे लागले आहे.

विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये…

– मुलींचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने

– संध्याकाळी राजस्थानी पद्धतीने

– मंगलाष्टके वैदिक पद्धतीने – राजस्थानमधून १०० जण येणार

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activist shankar baba papalkar daughter to get marry with buldhana man zws