अकोला : जिल्ह्यात डोळ्यांची जोरात साथ सुरू आहे. ही साथ वेगाने पसरत असून घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांना औषधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण चांगलेच बेजार झाले आहेत. आरोग्य यंत्रणा देखील कोमात गेली आहे.जिवाणूंचा संसर्ग, विषाणूंचा संसर्ग यासह विविध प्रकार डोळे येण्याच्या साथीमध्ये असून हे दोन्ही डोळ्यांचे रुग्ण बरे होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबद्वारे त्यावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, आवश्यक ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबचा तुटवडा जाणवत आहे. आषधे आवश्यतेनुसार उपलब्ध नाहीत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. डोळे येण्याची साथ शाळांमधून देखील जोरात पसरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळेतील विद्यार्थी एकत्रित येत असतात. त्यात अनेकवेळा डोळे आल्यानंतरही काही विद्यार्थी शाळेत हजर राहतात. त्यामुळे साथीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. काही शाळा प्रशासनाकडून या संदर्भात खबरदारी देखील घेण्यात येत आहे. मात्र, त्याला देखील पर्यादा येत असल्याने संसर्ग वाढण्यास हातभार लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील औषधी विक्रीच्या दुकानामध्ये महत्त्वाच्या आय ड्रॉपचा साठा उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १० हजार ड्रॉपचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola district continues to support the eyes ppd 88 amy