बुलढाणा: होय! हा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नव्हे तर शासकीय विभागाचा आहे! जिल्हा कामगार अधिकारी आनंद राठोड यांनी जिल्ह्यातील ‘इंग्रजी प्रेमी’ दुकानदारांना हा शासकीय इशारा दिला आहे. इंग्रजी पाट्यावरून जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीप्रमाणे आक्रमक दिसत नसल्याचे अनपेक्षित चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाने मराठी पाट्यासाठी पुढाकार घेतला आहे. कामगार अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलढाणा शहरातील इंग्रजी पाट्या लावलेल्या व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहे. दुकानदारांच्या भेटी घेऊन त्यांना सूचित करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलक काढून मराठी अक्षरात लावण्याचे आदेश देण्यात येत आहेत जिल्ह्यातील सर्व इंग्रजी पाट्या लावलेल्या दुकानदारांना नोटीस देण्यात येत असून कर्मचारी तालुकास्थळी जाऊन नोटीस बजावणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. दुकानावरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर १९१८ च्या ३५ (१)(क) नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.