अमरावती : येथील चपराशीपुरा परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्‍याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली. रियाजउद्दिन शेख शफिउद्दिन शेख (५०) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण आणि बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍न चर्चेत आलेला असताना अमरावतीतही धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी शिक्षक हा शारीरिक शिक्षण हा विषय शिकवतो. १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी शाळेच्‍या मधल्‍या सुटीदरम्‍यान एक विद्यार्थिनी भोवळ येऊन खाली पडली. या मुलीला वर्गात बसवण्‍यात आले. सर्व मुले-मुली तिच्‍या भोवती गोळा झाले होते. पीडित विद्यार्थिनी सर्वात मागे होती. त्‍यावेळी आरोपी शिक्षकाने मुलांना बाजूला करण्‍याच्‍या प्रयत्‍नात पीडित विद्यार्थिनीच्‍या शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्‍पर्श केला. त्‍यावेळी पीडित मुलीने शिक्षकाचा हात झटकला आणि ती तेथून बाजूला झाली. यापूर्वी सुद्धा आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला आपण बाहेर फिरून येऊ, असे म्‍हटले होते. ही बाब पीडित मुलीने तिच्‍या आईला सांगितली. पीडित मुलीची आई लगेच शाळेत पोहचली आणि तिने हा प्रकार शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला सांगितला. त्‍यानंतर फ्रेझरपुरा पोलीस ठाण्‍यात पोहचून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्‍याला तत्‍काळ अटक केली.

हेही वाचा: “सरकार पुन्हा आल्‍यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढविणार…”, मंत्री म्हणाले, “जोपर्यंत जिवंत आहे…”

कोलकाता आणि बदलापूरच्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्‍ये जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून महिला पोलीस अधिकारी आणि त्‍यांचे पथक विद्यार्थी, विद्यार्थिनींना लैंगिक अत्‍याचार, छेडखानीचे प्रकार रोखण्‍यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याच अनुषंगाने पोलिसांचे पथक संबंधित शाळेत पोहचले होते. त्‍या ठिकाणी लैंगिक अत्‍याचार आणि इतर गुन्‍ह्यांसंदर्भात माहिती देण्‍यात आली. अशा प्रकारच्‍या घटना निदर्शनास आल्‍यास मुख्‍याध्‍यापकांनी तत्‍काळ पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असल्‍याच्‍या सूचना दिल्या होत्‍या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: हनीट्रॅपमध्ये फसला, ब्रह्मोसची माहिती पाकिस्तानला दिली…जन्मठेप मिळताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात येथील इर्विन चौक परिसरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने इयत्‍ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून विनयभंग केल्‍याचा प्रकार घडला होता. पीडित मुलीने सुरुवातीला तिच्‍या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. त्‍यानंतर ही घटना उघडकीस आली होती.