|| अनिल कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात

नागपूर : शहरातील महिला व तरुणींच्या छेडखानीच्या घटना आणि टारगट तरुणांचा त्रास बघता बंगळूर पोलिसांनी विशेष करून महिला व शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचे पिंक पॅट्रोलिंग सुरू केले आहे. त्याच धर्तीवर नागपुराताही लवकरच पिंक पॅट्रोलिंग सुरू होणार आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांतील महिला व तरुणींशी छेडखानी, लैंगिक अत्याचार, विनयभंग, सार्वजनिक ठिकाणी टारगट युवकांचा त्रास, कार्यस्थळी होणारे अत्याचार, महिलांची पिळवणूक आणि शेरेबाजी अशा घटनांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात फिरताना महिला व तरुणींना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न पिंक पॅट्रोलिंगच्या माध्यमातून बंगळुरू पोलिसांनी केला आहे.

अशाच प्रकारचे वातावरण नागपूर शहरातही आहे. त्यामुळे महिला व तरुणींना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. तो गृहमंत्रालयात पाठवण्यात आला असून नागपूर पोलीस त्याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती आहे.

काय आहे ‘पिंक पॅट्रोलिंग’

पोलीस विभागाने महिला पोलिसांसाठी गुलाबी रंगाचे सुसज्ज असे चारचाकी वाहन तयार केले आहे. त्या वाहनात तीन महिला कर्मचारी असतील. तर दुचाकींनासुद्धा गुलाबी रंग देण्यात आला आहे. वायरलेससह महिला कर्मचारी शहरात गस्त घालणार आहेत.

काय परिणाम दिसेल?

शाळकरी मुली, तरुणी, महिलांना संकटसमयी त्वरित मदत मिळवून देण्यासाठी पिंक पॅट्रोलिंग पथक तत्पर असेल. त्यामुळे टारगट युवकांचा त्रास किंवा पाठलाग करणाऱ्यांसह शेरेबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पथक काम करेल. काही दिवसांतच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

कुठे काम पिंक पॅट्रोलिंग

शहरातील शाळा-महाविद्यालये, शॉपिंग मॉल, मंदिरं, फुटाळा, अंबाझरी तलाव, महाल, सीताबर्डी बाजारपेठ यासारखे गजबजलेले परिसर, चित्रपटगृहे, शासकीय कार्यालये आणि शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पिंक पॅट्रोलिंग करण्यात येईल.

पिंक पॅट्रोलिंगचा प्रस्ताव नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून पाठवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर उपराजधानीत पिंक पॅट्रोलिंग सुरू करण्यात येईल. शाळकरी मुली-तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलीस कटिबद्ध आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pink patrolling vice capital lines bangalore first experiment state nagpur akp