नागपूर : वेदनेने विव्हळत असलेल्या, पण मागील दोन्ही पाय उचलू न शकता येणाऱ्या वाघिणीला अखेर तातडीची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन रात्री उशिरा बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. पांढरकवडा वनक्षेत्रातील “टी-९” या वाघिणीची तो बछडा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र कक्ष क्र. २० (ब) सावळी रोपवनामध्ये वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याचे मंगळवारी आढळून आले. वाघिणीला मागचा पाय उचलताच येईना, त्यामुळे ती एका जागेवरुन दुसऱ्या जागी चालू शकत नव्हती. या परिस्थितीत तिच्या जीवाला धोका असल्याने तिला उपचारासाठी जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वाघीणीला बेशुद्ध करण्याकरीता औषध तयार केले व ते अजय मराठे (निशानेबाज) यांनी सदर वाघीणीच्या डाव्या खांद्यावर अचुक निशाना साधुन रात्री ८.२९ वाजता तिला डार्ट मारला.

वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तीची तपासणी केली असता, सदर वाघीण फारच अशक्त असुन तिच्या मागील पाय लुळे झाल्याचे दिसून आले. सदर वाघीणीला अर्धाग्यवायु झाला असल्याचा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी अंदाज वर्तविला. त्यानंतर सदर वाघीणीचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. सदर वाघीणीस पुढील उपचाराकरीता गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपुर येथे स्थलांतरीत करण्यात आले.

ही कार्यवाही धनंजय वावभासे, उपवनसंरक्षक पांडरकवडा वनविभाग पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली व संगिता कोकणे, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) वणी यांनी व टी. एन. साळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन, वंदना विधाते, आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress medical emergency ill gorewada wildlife rescue center nagpur rgc 76 ssb