नाशिक : सोमवारी रात्री शहरात २० वर्षाच्या तरूणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासह टोळीयुध्द, वाहनांची तोडफोड, अशा विविध माध्यमातून गुन्हेगार पोलिसांना सातत्याने आव्हान देत आहेत. काही महिन्यांपासून हत्यांची मालिकाच शहरात सुरू आहे. सोमवारी रात्री सातपूर परिसरातील शिवाजी नगरात नसीम शहा (२०, रा. गुरूद्वारा रोड) हा दत्त मंदिर रस्त्याने जात असतांना टोळक्याने त्याला थांबवत विचारणा केली. बहिणीला प्रेमाविषयी विचारणा करतो का, असे खडसावत त्याला लाथाबुक्यांनी टोळक्याने मारहाण केली.
हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली. मारहाणीत नसीम गंभीर जखमी झाला. डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. पोलीस घटनास्थळी पोहचताच संशयित पळून गेले. गंगापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा एकचे पथक संशयितांच्या मागावर आहे. परिसरातील सीसीटीव्ही तसेच अन्य माध्यमातून संशयितांची माहिती घेतली जात आहे. जखमी नसीम याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.