नाशिक : अनधिकृत धार्मिक बांधकामावरील कारवाईदरम्यान उसळलेल्या दंगल प्रकरणी ३९ संशयितांची शनिवारी येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रवानगी केली. यामध्ये या प्रकरणात नव्याने अटक झालेल्या दोघांचाही समावेश आहे. काठे गल्ली सिग्नलजवळील धार्मिक बांधकामावरील कारवाईवेळी बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.

अनधिकृत धार्मिक बांधकाम काढण्यासाठी तयारी सुरू झाल्यानंतर हिंसक जमावाने दगडफेक करुन विरोध केला. यात २१ पोलीस जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटकसत्र राबविले. या प्रकरणात ३७ संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात आणखी दोघांना अटक करण्यात आली. या सर्व संशयितांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

संशयितांमध्ये एमआयएमचा शहराध्यक्ष मुख्तार शेख याच्यासह अन्य राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नातेवाईक आणि समर्थकांची न्यायालय परिसरात गर्दी झाली होती. त्यामुळे संशयितांनाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुकडील मार्गाने न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयितांची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली.