नाशिक : राज्यात ६९२.७४ चौरस किलोमीटर क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि तीन अभयारण्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली असताना धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासात अंजनेरीचा समावेश नसल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. संकटग्रस्त वन्यजीवांच्या यादीतले जीव अंजनेरी क्षेत्रात शेवटची घटका मोजत असल्याने त्याचा समावेश करण्याची आवश्यकता होती, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील आण क्षेत्रांना दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. राज्यातील १२ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील कळवण (८४.१२ चौ.कि.मी), मुरागड (४२.८७ चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (९६.९७ चौ.कि.मी), इगतपुरी (८८.४९९ चौ.कि.मी) यांचा समावेश आहे. राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत.

संकटग्रस्त वन्यजीवाच्या यादीतले जीव अंजनेरी क्षेत्रात आहेत. भारतातील हे सर्वात महत्वाचे गिधाड अधिवास क्षेत्र असून ते कमालीचे बाधित झाले आहे. अंजनेरी संवर्धन राखीव असूनही तिथे वनविभागानेच थेट माथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता बांधण्याची परवानगी दिल्याने वनविभागानेच त्याच्या अधिवासावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या ठिकाणी गिर्यारोहणाला याच कारणासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. ही बंदी पाच-सहा वर्षांपासून घालण्यात आली आहे. डोंगरावर पर्यटकांना कॅमेरा नेण्यास बंदी आहे. वनविभाग यावरच थांबले नाही, वनविभागाने रस्त्याच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना पिके घेण्यास मज्जाव केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत अंजनेरीवर रोपवेची घोषणा केली. तिथे रोपवेने  लोकांना कशासाठी न्यायचे आहे, याचा उलगडा रोपवे तयार करताना होणे गरजेचे आहे. अंजनेरीवर जुने कुठलेही हनुमानाचे मंदिर नाही. अंजनी मातेचे लहान मंदिर आहे, त्याशिवाय काहीही नाही. या डोंगराच्या माचीवर काही जैन लेणी असून पायथ्याला जैन, महानुभाव, हिंदु पद्धतीची जुनी मंदिरे आहेत. अर्थात या ठिकाणच्या इतिहासावर अजून भरपूर अभ्यास होणे बाकी असल्याने धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासात अंजनेरीचा समावेश होणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfied inclusion endangered wildlife habitat concern wildlife counts endangered species ysh