गर्भपात प्रकरणात अर्भकाची डीएनए चाचणी
अवैध गर्भपात प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या प्रसृतीतज्ज्ञ डॉ. वर्षां लहाडे यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणात पंचवटीतील अमरधाममध्ये पुरलेले अर्भकही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. या अर्भकाच्या ‘डीएनए’सह आवश्यक त्या चाचण्या करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपात केल्या प्रकरणी फरार असणाऱ्या डॉ. लहाडे पोलिसांना शरण आल्या होत्या. २८ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर गुरूवारी डॉ. लहाडेंना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने तपासातील प्रगतीची माहिती दिली.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणात डॉ. लहाडे या मुख्य संशयित आहेत. सध्या संपूर्ण तपास त्यांच्या भोवती केंद्रीत झाला आहे. डॉ. लहाडे यांच्या हॉस्पिटलच्या नोंदणीतील गैरप्रकार उघड झाला आहे. तपास कामात अर्भकाच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या पुणे येथील प्रयोगशाळेतून करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अद्याप तपास अपूर्ण
अवैध गर्भपात प्रकरण हे मोठे रॅकेट आहे. त्यातील प्रत्येक घटकाचा शोध घेतला जात आहे. गर्भपातानंतर लागलीच पुरलेल्या अर्भकाचा शोध तपास यंत्रणेने घेतला. पंचवटीतील अमरधाममध्ये पुरलेले अर्भक ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्याने डॉ. लहाडे यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत डॉ. लहाडेंची पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.