प्रसेनजीत इंगळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरारमध्ये पुन्हा एकदा खाकीतल्या माणुसकीचे दर्शन झाले आहे. एकट्या राहणाऱ्या व्यक्तीचा अचानक मुत्यू झाल्यानं लॉकडाउमुळं त्याचे कोणतेही नातेवाईक अंत्यसंस्कारास येवू शकले नाहीत. त्यामुळे विरार पोलिसांनीच रीतीप्रमाणं या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले. विरार पोलिसांतील पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी या मृतदेहावर सोपस्कार केले.

विरार पूर्व येथील फुलपाडा परिसरात राहणारे ४२ वर्षीय प्रमोद अयोध्या प्रसाद खारे हे रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय करत होते. दोन वर्षापूर्वीच ते या परिसरात राहायला आले होते. ते अविवाहित असल्याने एकटेच राहत होते. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपलं काम संपवून घरी आले आणि जेवण करून झोपले. सकाळी शेजारी त्यांना उठवायला गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून पहिले, तर त्यांना खारे हे बिछान्यावर निपचित पडलेले आढळून आले. यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने विरार पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि खारे यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे.

यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस नाईक सुभाष शिंदे यांच्यावर आली, शिंदे यांनी खारे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना घटनेची पूर्ण माहिती दिली. पण करोनाचा काळ सुरु असल्याने देशभरात लॉकडाउन असल्याने त्यांचे दिल्लीत राहणारे आई, भाऊ तर कोलकात्यात राहणारा दुसरा भाऊ यांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी येणं शक्य नव्हतं.

यावेळी पोलीस नाईक शिंदे यांनी खारे यांच्या कुटुंबातील सर्व रिती, प्रथांप्रमाणे खारे यांच्या मृतदेहावर सोपस्कार केले. हे करताना त्यांनी त्याच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलवर ठेवले आणि त्यांना संपूर्ण प्रकिया दाखविली. त्यानुसार, आज दुपारी विरार पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले. खाकीतल्या या माणुसकीमुळे खारे कुटुंबियांनी विरार पोलिसांचे आभार मानले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Because of lockdown relatives could not attend the funeral the program was carried out by the police aau