डॉ. माधवी वैद्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात सूप ही अतिशय आवश्यक अशी वस्तू होती. धान्य पाखडण्यासाठी, भाजलेल्या शेंगदाण्यांची फोलपटे पाखडण्यासाठी वगैरे अनेक गोष्टींसाठी त्याचा फार चांगला उपयोग गृहिणी करून घेत असत. पण ते सूप कधीतरी जुनेपुराणे होतच असे. मग गृहिणी ते सूप लगेच टाकून न देता त्याला शेणाचा मुलामा देऊन ते परत एकदा वापरण्यास योग्य करीत. आता हे जितके खरे तितकेच आपल्या जीर्ण होणाऱ्या शरीराची वेळच्या वेळी काळजी घेऊन ते शरीर जास्तीत जास्त कार्यक्षम ठेवणेही आवश्यक आहे. एकुणात काय तर प्रत्येक गोष्टीसाठी सध्याच्या भाषेत बोलायचे तर ‘मेंटेनन्स’ आवश्यक असतो. शरीर ही देखील परमेश्वराने निर्माण केलेली अत्युत्कृष्ट यंत्रणा आहे, हे आपण अनेकदा विसरतो. शरीराच्या कुरबुरी सुरू झाल्या की जीव एकवटून एकदम सारे प्रयत्न करू लागतो. वेळीच एक टाका घातला तर तो पुढील १० टाक्यांचे काम करीत असतो, ही मोलाची गोष्टही आपण विसरतो.

पण केळकर आजोबांचे तसे नव्हते. त्यांचे जगणे अतिशय आदर्श असे होते. आपला आहार, आपला व्यायाम, आपली विश्रांती ही निरोगी आयुष्यासाठीची त्रिसूत्री आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांचे वय सत्तरी ओलांडून पुढे गेलेले असले तरी त्यांच्या सर्व शारीरिक तपासण्यांचे रिपोर्ट्स चाळिशीच्या तरुणाला लाजवतील असे होते. आणि त्यांचा काम करण्याचा आवाकाही तरुणांना लाजविणारा असाच होता. सर्वानाच याबद्दल आश्चर्य वाटे.

त्यांच्या या उत्तम शरीर प्रकृतीचे रहस्य काय, असे एखाद्या तरुणाने विचारले तर ते सहजच म्हणत, ‘तेवढे मात्र माझ्या गृहखात्याला म्हणजे तुमच्या केळकर आजींनाच विचारा! त्या सांगतील.’ त्यावर केळकर आजी म्हणत, ‘अरे, काही नाही रे! माझी आजी मला एक म्हण नेहमी सांगायची. जुने सूप शेणाने घट्ट होते आणि म्हातारा माणूस खाण्याने!’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra old man grain housewife efficient ysh