प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हा हवेतील एक महत्त्वाचा घटक आहे. हवेतील साधारणपणे २१ टक्के भाग ऑक्सिजनचा आहे. शरीराच्या प्रत्येक पेशीला त्याची आवश्यकता असते. एखाद्या उंच डोंगरावर आपण गेलो तर तिथे हवेचा दाब कमी असल्याने आपल्या शरीराला कमी प्राणवायू मिळतो. त्यामुळे आपल्याला अधिक वेगाने श्वास घ्यावा लागतो. आजकाल करोनाचे संकट थैमान घालत आहे. या आजारांमध्ये फुप्फुसांची ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता कमी होते. म्हणून अशा आजारी व्यक्तीला शुद्ध ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करतात. आपण बातम्यांमध्ये ऐकले असेल की प्राणवायूअभावी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. एवढा उपयोगी आहे हा प्राणवायू. तो आपल्याला हवेतून फुकट मिळतो. ही निसर्गाची सजीव सृष्टीला दिलेली देणगी आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की हा वायू हवेत कसा, कुठून आणि केव्हा आला?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज जे वातावरण पृथ्वीभोवती आहे ते तसे आधीपासून नव्हते. आजचे वातावरण तयार व्हायला अनेक वर्षे लागली. सुरुवातीच्या काळात अनेक ज्वालामुखींचे उद्रेक झाले. या ज्वालामुखींमधून कर्ब-द्वि-प्राणील (कार्बन डाय-ऑक्साइड) वायू बाहेर पडला. हा वायू वातावरणात साचत गेला. काही काळानंतर पृथ्वीवर वनस्पती वाढू लागल्या. वनस्पतीने हवेतील कर्ब-द्वि-प्राणील वायू घेऊन हवेत प्राणवायू सोडायला सुरुवात केली. तसे पाहिले तर वनस्पती यादेखील सजीव असतात. त्यांनाही प्राणवायूची गरज असते. परंतु त्या जेवढा प्राणवायू घेतात त्यापेक्षा जास्त बाहेर टाकतात. यामुळे हवेत प्राणवायू साठत गेला.

काही काळानंतर पृथ्वीवर प्राणी निर्माण झाले. हे सजीव प्राणवायू आत घेऊन कर्ब-द्वि-प्राणील वायू बाहेर टाकतात. त्याचबरोबर वस्तूचे जेव्हा ज्वलन होते तेव्हादेखील ज्वलनशील पदार्थाचा प्राणवायूशी संयोग होऊन कर्ब-द्वि-प्राणील हा वायू तयार होतो. प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये परस्पर विरोधी क्रिया होत असल्याने हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखले जाते.

एकीकडे लोकसंख्या भरमसाट वाढते आहे. त्याचबरोबर इंधनाचे ज्वलन मोठय़ा प्रमाणावर होत आहे. याउलट जंगलतोडीमुळे वनस्पतीची संख्या घटते आहे. त्यामुळे प्राणवायूचे हवेतील प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी इंधनाचे ज्वलन कमी करून वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे.

डॉ. सुधाकर आगरकर

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did oxygen come into the atmosphere oxygen in earth s atmosphere zws