डॉ. नंदिनी वि. देशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्र विज्ञानातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे ‘स्क्रिप्स सागरीविज्ञान संस्था’ येथे जाऊन प्रशिक्षण घ्यावे हे स्वप्न असते. हे संपूर्ण जगातील सर्वात जुने आणि भव्य केंद्र अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅनडिएगो येथे १९०३ साली स्थापन करण्यात आले आणि ते सॅनडिएगो विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे. इथे समुद्र विज्ञानाच्या तसेच पृथ्वी विज्ञानाच्या विविध शाखांतील संशोधन चालते. त्याचा अभ्यास करण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर प्रशिक्षण दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या संशोधन नौकांतून मोहिमांवर जाणे, समुद्रात पोहणे, स्कुबा डायिव्हग करणे याचाही सराव करावा लागतो. या संस्थेच्या स्वत:च्या चार संशोधन नौका असून निरनिराळय़ा किनाऱ्यांवर स्थित अनेक प्रयोगशाळा आहेत. स्क्रिप्स संस्थेमार्फत ‘एक्स्प्लोरेशन्स नाऊ’ हे शोध-निबंध मासिक प्रकाशित होते.

सुरुवातीला फ्रेड बेकर या शंखांवर अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्तीने आपल्या दोन सहकाऱ्यांसमवेत या संस्थेची आखणी केली होती. इ.डब्ल्यू. स्क्रिप्स आणि त्यांची भगिनी एलन ब्राऊिनग स्क्रिप्स या दोघांनी दिलेल्या आर्थिक साहाय्यामधून या संस्थेची उभारणी झाली. १०० वर्षांहून जुनी असलेली ही संस्था आता जीवशास्त्र, भौतिक, रसायन शास्त्र, भूगर्भशास्त्र, समुद्राचा आणि धरेचा भूभौतिक अभ्यास असे विविध विषयांतर्गत प्रशिक्षण देते. समुद्राच्या वातावरणाशी आणि हवामानाशी असलेल्या संबंधांवर या संस्थेत अधिक  संशोधन केले जाते. या भव्य संस्थेत १३०० लोक काम करत असून त्यापैकी २३५ प्राध्यापक आहेत आणि १८०  इतर शास्त्रज्ञ आहेत. येथे जीवशास्त्र, पृथ्वी अभ्यास आणि समुद्र व वातावरण असे तीन प्रमुख संशोधन विभाग असून प्रत्येकात अनेक उपविभाग आहेत. या विभागांकरवी एकत्रित पद्धतीने अनेक संशोधन संकल्पना राबवल्या जातात. यात जैवविविधता संवर्धन, कॅलिफोर्नियातील पर्यावरण, पृथ्वी आणि एकूणच ग्रहांचे रसायनशास्त्र, पर्यावरण आणि ऊर्जा, पर्यावरण आणि मानवी आरोग्य, जागतिक पातळीवर पर्यावरणात होणारे बदल, हिमनग आणि त्याची परिस्थिती याची माहिती, समुद्री जीव, समुद्रातील ध्वनी आणि प्रकाश, लाटा, प्रवाह आणि अभिसरण अशा सागराशी निगडित विविध विषयांत संशोधन केले जाते. भारतीय तरुणांची शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची प्रबळ इच्छा असते. अशा संस्थेत प्रवेश घेऊन हिंदी महासागराची गुपिते शोधून काढणे, हा खूप छान पर्याय आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal scripps institution of oceanography every student of oceanography go here and get training ysh