कमांडर रॉबर्ट बॅलर्ड, अमेरिकन लष्करी सेवेत ३० वर्षे होते. काही काळ नौदलाच्या गुप्तहेर विभागात होते. भूगर्भ-रसायनशास्त्रात पदवी घेतल्यावर पाण्याखालचे भूपृष्ठ मापणे, डॉल्फिन-व्हेलना प्रशिक्षित करणे, पाणबुडय़ा म्हणून कसून सराव करणे, खोलवरच्या पाण्याच्या पृथक्करणाने तेथील जीवसृष्टी अभ्यासणे, अशी कामे त्यांनी केली. बॅलर्ड यांनी समुद्रतळ शोधासाठी ‘नॉर’ जहाज वापरले. अर्गो हे पाण्याखालील लहानमोठय़ा वस्तू हुडकणारे, प्रकाश-ध्वनी चित्रणप्रणालीयुक्त, दणकट रोबोट-वाहन बनवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॅलर्डनी अर्गो वापरून मोठय़ा क्षेत्रात टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी सरकारी निधी मागितला. नौदलाने तो नाकारला परंतु अमेरिकन सरकारच्या १९६०मध्ये बुडालेल्या आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुडय़ा शोधण्यासाठी त्यांना निधी मंजूर करण्यात आला. समुद्रतळी पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाणबुडय़ा फुटल्या असाव्यात, असा बॅलर्ड यांचा अंदाज होता. अर्गोने समुद्रतळ विंचरून काढला. यात त्यांना टायटॅनिकचे भग्नावशेष सापडले.

हेही वाचा >>> कुतूहल : उपग्रहांद्वारे समुद्र अभ्यास

टायटॅनिक ही श्रीमंत प्रवाशांच्या आरामदायक प्रवासासाठी बांधलेली बोट, ९०० फूट लांब आणि ९० फूट रुंद होती. दोन हजार २२५ प्रवासी घेतल्यावर ६६ हजार टन वजन होईल एवढी टायटॅनिक महाकाय होती. नाना सुखसोयींनी युक्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेली टायटॅनिक ‘अनसिंकेबल’ मानली जाई. दुर्दैवाने पहिल्याच जलप्रवासात, इंग्लंडमधील साउथहॅम्पटनहून अमेरिकतील न्यूयॉर्कला जाणाऱ्या मार्गात, ती १४ सप्टेंबर १९१२च्या रात्री हिममहानगावर आपटली. काही तासांतच १५ सप्टेंबर १९१२च्या पहाटे सव्वादोन वाजता ती बुडाली. या अपघातात दीड हजार जणांचा मृत्यू झाला. नंतर तब्बल ७३ वर्षांनी रॉबर्ट बॅलर्ड यांना १ सप्टेंबर १९८५ रोजी टायटॅनिकचा बॉयलर आणि भग्नावशेष ३९६२ मीटर (१३००० फूट) खोलीवर अटलांटिक महासागरात सापडले.

हेही वाचा >>> कुतूहल : जागतिक व्हेल शार्क दिन

१९८९मध्ये बिस्मार्क युद्धनौकेच्या अवशेषांचा शोधही बॅलर्ड यांनी लावला. १९९८ मध्ये बॅलर्ड यांच्यामुळेच यूएसएस यॉर्कटाऊन या बुडालेल्या विमानवाहू अजस्र नौकेचे अवशेषही मिळाले. हे सर्व शोध अद्वितीय होते. परंतु रॉबर्ट बॅलर्ड यांना तुम्ही सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट शोधली आहे, विचारले तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘उष्णजल निर्गम’. समुद्रतळीच्या अतिप्रचंड खडक- पट्टय़ांमधील फटींना उष्णजल निर्गम म्हणतात. तेथे उच्च तापमान आणि उकळते पाणी असू शकते. आदिजिवाणूंचे (आर्किआ) जीवशास्त्रीय नवविश्व उष्णजल निर्गमांनी उघडले आहे. जीवशास्त्रदृष्टय़ा अद्भुत, उकळत्या पाण्यातही जगणारे जीव सापडल्यामुळे बॅलर्ड यांचा दावा खरा ठरला आहे.       

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org रॉबर्ट बॅलर्ड

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal american oceanographer robert ballard zws