वाडा : वीजपुरवठा खंडित केलेल्या शेजाऱ्यास वीज दिल्याने वाडय़ातील ३३ वीज ग्राहकांविरोधात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या ग्राहकांकडून साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ९५० वीजग्राहकांकडे ३१ मार्च २०२३ पूर्वीची ७५ लाखांची वीज थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहितीही महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणने ३१ मार्च २०२३ पर्यंत ग्राहकांना वारंवार आवाहन करून थकीत वीज देयके भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही शहरातील घरगुती वीज वापरणाऱ्या ९५० ग्राहकांनी थकीत देयकाचा भरणा केलेला नाही. जवळपास ही थकीत रक्कम ७५ लाखांहून लाखांहून अधिक आहे. त्यामुळे वीज देयक थकबाकीदारांविरोधात महावितरणने कारवाई सुरू केली आहे. त्यात काही थकबाकीदारांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. अशा काही ग्राहकांनी शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना वीज देणाऱ्या ३३ ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाई केली आहे.
शेजारच्या घरात वीज देणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती असतानाही काही ग्राहकांकडून हा गुन्हा केला जात आहे. मागील महिन्यात भरारी पथकांनी शहरात टाकलेल्या छाप्यात ३३ ग्राहकांवर न्यायालयीन नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत साडेचार लाखांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, वेळेवर विद्युत देयके न मिळणे, अशा महावितरण कंपनीच्या ढिसाळ व मनमानी कारभाराबाबत ग्राहकांकडून टीका केली जात आहे.
वीज ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत विद्युत देयके भरून महावितरणला सहकार्य केल्यास कारवाई करण्याची वेळच येणार नाही.