खासगी कंपनी आणि संस्थांच्या पुढाकारातून ओसाड जमिनीवर लागवड

नीरज राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर : पालघर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील नारगोळ या गावाच्या समुद्रकिनारी जगातील सर्वात मोठे मियावाकी वनाची लागवड विक्रमी वेळेत करण्यात आली आहे. साडेसात एकर ओसाड व नापिक जमिनीत कृत्रिम जंगल तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम लोक सहभागातून हाती घेण्यात आहे. हे वन आगामी काळात देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

नारगोळ समुद्रकिनारी असलेल्या खाजण जमिनीवर कृत्रिम वन उभारण्याच्या दृष्टीने एन्व्हायरो आणि फॉरेस्ट क्रिएटर्स फाऊंडेशन, मुंबई यांच्या मदतीने कृत्रिम व उभारण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत तसेच वनविभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. गावातून वाहून जाणारे पावसाचे पाणी एकत्रित करून गोळा करण्यासाठी नाळेव पाट खोदण्यात आले. त्याचबरोबरीने या परिसराततीन मोठे तलाव खणण्यात आले.

गोदरेज प्रॉपर्टीज (मुंबई) यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून सुमारे दोन कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून खाऱ्या पाण्यामुळे बाभूळ व काटेरी झाड असणाऱ्या या क्षेत्रांमध्ये ६० पेक्षा अधिक देशी, स्थानिक प्रकारची फळ-फुलं झाडे, लाकडाच्या वापरासाठी उपयोगी असणारी तसेच सावली देणारी एक लाख वीस हजारपेक्षा अधिक झाडांची विक्रमी २७ दिवसांमध्ये लागवड करण्यात आली. दोन ते साडेतीन फूट उंचीचे व तीन ते चार महिने वयोमान असलेली झाडे लागवड करण्यात आली असून समुद्रकिनाऱ्यालगतची ही वनराई आगामी काळात प्रेक्षणीय ठरणार आहे.

नारगोळ गावातील मालवण बीच येथे दरवर्षी अनेक पक्ष्यांच्या प्रजाती येत असतात. या जंगलाच्या निर्मितीमुळे मालवण बीचवर शेकडो जातींच्या पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येतील. हा प्रकल्प किनारपट्टीला लागूनच बांधल्या गेल्याने नारगोळ गावात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरणार आहे. देशात या प्रकारची ५८ पेक्षा अधिक वने तयार करण्यात आली आहेत.

– डॉ. आर. के. नायर, सहसंस्थापक- एन्व्हायरो आणि फॉरेस्ट क्रिएटर फाऊंडेशन, मुंबई

मियावाकी जंगल म्हणजे काय

मियावाकी वन पद्धती सुमारे ४० वर्षांपूर्वी जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केली होती. या पद्धतीत  विशिष्ट रचनेत  अगदी जवळजवळ झाडांची रोपे लावली जातात. या पद्धतीने लागवड केलेली झाडे फार वेगाने वाढतात. या जंगलात औषधी प्रजातीच्या विविध झाडांसह अन्य झाडे लावली जातात.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Largest miyavaki forest world border palghar ssh